कणकवली : सह्याद्री परिसरात मंगळवारी मध्यरात्री ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने जानवली नदीला जोरदार पूर आला होता. त्यामुळे पुराचे पाणी कलमठ गुरववाडी, कलेश्वरनगर, महाजनीनगर व लांजेवाडी भागातील अनेक घरांमध्ये घुसले होते.अचानक पूर आल्याने नागरिकांची एकच धावाधाव झाली. पुराचे पाणी घुसल्याने अनेक दुचाकी, चारचाकी वाहनांचे नुकसान झाले. तालुक्यातील गावांगावांतील नद्यांना पूर आल्याने झाडे, साकव वाहून जाण्याबरोबरच भातशेतीचेही मोठया प्रमाणावर नुकसान झाले. गेले काही दिवस पावसाचा जोर कमी झाला असतानाच मंगळवारी सायंकाळपासून तालुक्याच्या विविध भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळू लागल्या. मात्र, रात्री 12 वा.च्या सुमारास फोंडाघाट ते कनेडी या सहयाद्रीच्या पट्टयातील गावांमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. अचानक पाऊस कोसळल्याने नदी-नाल्यांना पूर आले होते. जानवली नदीला पूर आल्याने कणकवली गणपती साना परिसर तसेच कलमठ गावातील गुरववाडी, कलेश्वरनगर, महाजनीनगर, लांजेवाडी हा भाग जलमय झाला होता. मध्यरात्री सर्वजण झोपेत असताना पुराचे पाणी परिसरात घुसले. कलेश्वरनगर येथील नाना पेंटर, गुलाबराव जाधव, विशाल जाधव, श्याम जाधव यांच्या घरात अचानक पाणी घुसले. त्यांनी बाहेर येवून पाहणी केली असता परिसर जलमय झाल्याचे दिसून आल्याने आरडाओरड करत आजूबाजूच्या नागरिकांना जागे केले. ऐन झोपेत असताना पुराचे पाणी घुसल्याने एकच धावपळ झाली. अनेकांच्या दुचाकी, चारचाकी गाड्याही पाण्याखााली गेल्या. पाण्याची पातळी तीन ते चार फुटांपर्यंत गेली होती. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर हळूहळू पाण्याची पातळी कमी झाली. वरवडे-फणसनगर भागातही पुराचे पाणी घुसले होते. काही घरांमध्ये पाणी गेले होते. तर काही ठिकाणी घरांच्या पायर्यांपर्यंत पाणी आले होते. लांजेवाडी येथील कांदे व्यापारी श्री.गोडबोले यांच्या गाडया पाण्याखाली गेल्या होत्या. वरवडे फणसनगर सेंट उर्सुला पुलालगत आचरा रस्त्यावर पाणी आले होते. तरंदळे मार्गावरील कलमठ येथील पूल पाण्याखाली गेला होता. कलमठ, वरवडे परिसरात पुराचे पाणी आल्याचे समजल्यानंतर तहसीलदार आर.जे.पवार यांनी मध्यरात्री 3.30 वा.च्या सुमारास या भागात जावून पाहणी केली. तसेच स्थानिक कार्यकर्त्यांनी पुरात अडकलेल्या गाडया बाहेर काढल्या. पुराचे पाणी नदी नाल्यांच्या पात्राबाहेर जावून आजूबाजूच्या भातशेतीमध्ये घुसले होते. सांगवे दिर्बादेवी मार्गावरील खडशीनदीवरील जुना पूल वाहून गेला. तर जानवली, साकेडी परिसरातही पुरामुळे नुकसान झाले. पुरामुळे नदीकाठावरील झाडे वाहून गेली. तर अनेक ठिकाणी पुरामुळे नदी-नाल्यांचे प्रवाह बदलले होते. मध्यरात्री पूर झाल्याने त्याचा जनजीवनावर परिणाम झाला नसला तरी नुकसान मात्र मोठ्या प्रमाणावर झाले आहे.
