नवी दिल्ली: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने विंडीज दौऱ्यातून दोन महिन्याची विश्रांती घेत देशसेवा करण्याच्या दिशेने एक पाऊल उचलले आहे. निवृत्तीच्या चर्चेदरम्यानच धोनीने लष्करात सामिल होणार असल्याचे सांगितले. त्यासाठी भारतीय लष्कराच्या पॅराशूट रेजिमेंटमध्ये धोनी ट्रेनिंग करणार आहे. भारतीय लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी धोनीला सैन्याबरोबर सराव करण्याची परवानगी दिली आहे. धोनी ३१ जुलै ते १५ ऑगस्टपर्यंत सैन्यासोबत सराव करणार आहे. या कालावधीत धोनी १०६ सेनेसोबत राहणार आहे. लष्करातील सर्वात खतरनाक असलेल्या विक्टर फोर्समध्ये धोनी ट्रेनिंग घेणार आहे. या कालावधीत धोनी पेट्रोलिंग(गस्त), गार्ड आणि पोस्ट ड्यूटी करणार आहे. निमलष्करी दलाने धोनीला २०११ मध्ये मानद लेफ्टनंट कर्नल रँक दिली होती. धोनीने भारतीय क्रिकेटला खुप काही दिले आहे आणि त्याचे लष्कराप्रती असलेले प्रेम सर्वांना माहित आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या व्यग्र वेळापत्रकामुळे त्याला ते जमले नाही. पण, आता तो लष्कराचे प्रशिक्षण घेण्यासाठी दाखल झाला आहे. असे एका लष्करी अधिकाऱ्याने सांगितले. मागील आठवड्यात संघ निवडीपूर्वी धोनीने बीसीआयला सैन्यात सेवा बजावणार असल्याचे सांगून विंडीज दौऱ्यातून माघार घेतली. धोनीच्या सैन्यात सेवा बजावण्याच्या विनंती लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी मान्य केली. धोनी पॅराशूट रेजिमेंटच्या बटालियनबरोबर सराव करणार आहे. या सरावाचा काही भाग जम्मू काश्मीरमध्येही होणार आहे. परंतु धोनीला कोणत्याही ऑपरेशनमध्ये सहभागी करून घेतले जाणार नसल्याचेही सांगण्यात आले आहे.
