मुंबई : सत्कार हा व्यक्तीचा नाही तर त्याच्या कामाचा व्हायला हवा,असे स्व. बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे, तेच ध्येय बाळगून आपण कार्यरत आहे. गावच्या मातीचे आकर्षण कधीही न मिटणारे आहे. कोकणचा सर्वांगिण विकास व्हावा हे आपले स्वप्न आहे. येत्या काळात गावागावांमध्ये सामूहिक शेतीचा अवलंब व बागायती शेती गरजेची आहे. कोकणात प्रक्रिया उद्योगांना मोठा वाव आहे. विकास हा जीवनमान उंचावणारा असला पाहिजे हे लक्षात घेऊन गावागावातील नागरिकांनी गट-तट बाजूला ठेवत विकासप्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अरविंद सावंत यांनी केले. कोकणातील विविध संस्थांच्यावतीने मुंबई-दादर येथे केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अरविंद सावंत यांचा नागरी सत्कार ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांच्या हस्ते करण्यात आला. सावंतवाडी संस्थान मराठा मंडळ, दादर मुंबई येथे हरित सिंधू प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, सावंत पटेल उत्कर्ष मंडळ, सावंतवाडी संस्थान , मराठा समाज , कोकण मराठी साहित्य परिषद, कोकण कला अकादमी, कुंभवडे ग्रामस्थ संघ, मुंबई, सिंधुदुर्ग जिल्हा मराठा समाज, अथर्व फाऊंडेशन मुंबई, गणेशभक्त कोकणवासिय प्रवासी संघ, मराठा बिझनेस फोरम, अखिल मराठा फेडरेशन, नरडवे महम्मदवाडी धरणग्रस्त समन्वय विकास समिती, अखिल नरडवे ग्रामोद्धार संघ. मुंबई, शंकर महादेव सावंत ग्रामविकास संस्था मुंबई, आदी संस्थांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी संस्थांचे पदाधिकारी, सदस्य व सिंधुदुर्गवासीय उपस्थित होते. कोकणातील माणसं एकत्र येत नाहीत, ही मोठी समस्या आहे. मात्र आता चित्र बदलण्यास सुरुवात झाली असून विकासाकडे वाटचाल होत आहे. खुर्चीवर नुसते बसून उपयोग नाही, तिचा वापर जनकल्याणासाठी व्हायलाच हवा. यासाठी आपणही पुढे यायला हवे. आज केंद्रीय अवजड मंत्री आपल्या हक्काचा आहे. एकत्र येऊन उद्योग उभारणी करावी लागेल, तरच खर्या विकासाची नांदी होईल. अभिमान वाटावा अशी कामगिरी करा, अशा शब्दात ज्येष्ठ साहित्यिक, पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी ना. अरविंद सावंत यांना शुभेच्छा दिल्या. ना. अरविंद सावंत म्हणाले, गावच्या विकासात मुंबईस्थित ग्रामस्थ मंडळांची भूमिका मोठी आहे. आता स्थानिकांनी आपली मन मोठी करायला हवी. आपल्या गावांमध्ये आजही गटातटाचे हेवेदावे आहेत. संकुचित मनाने मोठं होता येत नाही. नरडवे गाव दत्तक घेतलं, पण विकास स्थानिक राजकारणातच अडकला. गावतळीवर राजकारण नको. राजकारण केवळ निवडणुकीपूरत असावं. विकास कुणाकडूनही होउदे, पण होउदे अशी भावना हवी. आपण पाठपुरावा करण्यात कमी पडतो. विकासाच्या नव्या संकल्पना घेऊन येऊन विकासकामासाठी माझा वापर करून घ्या असे आवाहन त्यांनी केले. सूत्रसंचालन शशी सावंत यांनी केले. विविध संस्थांतर्फे दिल्या गेल्या सन्मानपत्राचे वाचन अभिनेत्री दीप्ती भागवत यांनी केले. यावेळी बी. डी. सावंत, इंद्रजित सावंत, प्रदीप ढवळ, चंद्रकांत सदडेकर, अप्पासाहेब पवार, शशिकांत पवार, निष्याद साटम, प्रमोद कृपाल, संतोष कदम, जगन्नाथ य.सावंत, सुधाकर वि.सावंत आदी उपस्थित होते.
