राज्यात २१ लाख 15 हजार मतदार वाढले

0

मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील एकूण मतदारांमध्ये 21 लाख 15 हजार 575 एवढी वाढ झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज्यात एकूण 8 कोटी 73 लाख 30 हजार 484 मतदार होते तर आता 31 ऑगस्टपर्यंत 8 कोटी 94 लाख 46 हजार 211 एवढी मतदार नोंदणी झाली आहे. लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी भारत निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत विशेष प्रयत्न करण्यात आले. जुलै-ऑगस्ट 2019 या कालावधीत विशेष संक्षिप्त पुनरिक्षण तर सुट्ट्यांच्या दिवशी विशेष शिबीरांचे आयोजन करण्यात आले. सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या माध्यमातूनही शहरी भागातील मतदार जोडण्यात आले. लोकसभा निवडणुकीच्या वेळी 4 कोटी 57 लाख 02 हजार 579 पुरुष मतदार व 4 कोटी 16 लाख 25 हजार 819 महिला मतदार होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी 31 ऑगस्ट 2019 रोजी प्रकाशित अंतिम मतदार यादीमध्ये पुरुष मतदारांमध्ये 10 लाख 35 हजार 262 नव्या पुरुष मतदारांची वाढ होवून ती 4 कोटी 67 लाख 37 हजार 841 एवढी झाली आहे. महिला मतदारांमध्ये 10 लाख 79 हजार 958 एवढी वाढ होऊन ती आता 4 कोटी 27 लाख 5 हजार 777 झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी 2 हजार 86 तृतीयपंथी मतदार होते त्यामध्ये 507 मतदार वाढून ते आता 2 हजार 593 एवढे झाले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर एकूण मतदारांमध्ये 21 लाख 15 हजार 575 एवढी वाढ झाली आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात महापूर आला होता. या महापुरात या दोन जिल्ह्यातील गावे बाधित झाली होती. या महापुरात या दोन जिल्हयातील नागरिकांचे संसारोपयोगी साहित्य, महत्वाचे दस्ताऐवज यांचे नुकसान झाले. ही बाबलक्षात घेऊन ऑक्टोबर महिन्यात होणार्‍या विधानसभा निवडणुकांसाठी या दोन जिल्ह्यातील नागरिकांना आता बदली ओळखपत्रे पुरविण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here