जी-7 राष्ट्रांच्या बैठकीसाठी पंतप्रधान मोदींना ब्रिटनचे आमंत्रण

0

नवी दिल्ली : ब्रिटनच्या पंतप्रधानांनी जी-7 राष्ट्रांच्या बैठकीसाठी विशेष निमंत्रिताच्या स्वरुपात पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमंत्रण दिलं आहे. जी-7 राष्ट्रांची या वर्षीची बैठक ही ब्रिटनमधील कॉर्नवल या ठिकाणी 11 जून ते 14 जून या दरम्यान होणार आहे. रविवारी ब्रिटिश उच्चायुक्तालयाने प्रसारित केलेल्या एका निवेदनात ही माहिती देण्यात आली. ब्रिटिश उच्चायुक्तालयाच्या निवेदनात असंही सांगण्यात आलं आहे की जी-7 राष्ट्रांच्या बैठकीच्या आधी ब्रिटनचे पंतप्रधान भारताचा दौरा करण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीची जी-7 राष्ट्रांची बैठक कोरोनामुळे रद्द करण्यात आली होती. या वर्षीची बैठक ही ब्रिटनमध्ये आयोजित करण्यात आली आहे.

ब्रिटिश उच्चायुक्तालयाने आपल्या निवेदनात भारताला ‘जगाची फार्मसी’ अशी उपमा दिली आहे. तसेच कोरोना लसीच्या निर्मीतीमध्ये भारताने केलेल्या प्रयत्नांचे कौतुकही करण्यात आलं आहे. निवेदनात म्हटलं आहे की, “भारत जगातील 50 टक्क्यांहून जास्त लसींची निर्मीती करतोय. ब्रिटन आणि भारताने या कोरोनाच्या संकटाचा सामना एकत्रितपणे केला आहे.”
ब्रिटनने जी-7 राष्ट्रांच्या बैठकीसाठी विशेष निमंत्रित म्हणून भारताबरोबरच ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण कोरिया या देशांनाही आमंत्रण दिलं आहे. जी-7 राष्ट्रांच्या बैठकीच्या आयोजनाचे यजमान पद मिळाल्यानंतर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन म्हणाले की, “कोरोना व्हायरससारख्या विनाशकारी महामारीचा अनुभव जगाने घेतला आहे. आधुनिक जगाची ही एक सर्वात मोठी परीक्षा होती. आता आपणा सर्वांनी खुलेपणाने एकत्रित येऊन भविष्यातील आव्हानांचा सामना करायचा आहे.”
या वर्षी जून महिन्यात जी-7 राष्ट्रांची बैठक ब्रिटनमध्ये आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कोरोना व्हायरस तसेच वातावरण बदल आणि इतर महत्वाच्या विषयावर चर्चा होणार आहे. जी-7 राष्ट्रांचा गट हा जगातील सर्वाधिक विकसित राष्ट्रांचा गट असून त्यामध्ये ब्रिटन, अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, जपान, इटली, जर्मनी आणि युरोपियन युनियनचा समावेश आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:01 PM 18-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here