भारतात गुंतवणूक करण्याचे आवाहन; नरेंद्र मोदी

0

न्यूयॉर्क : जगभरात भारत गुंतवणुकीसाठी सुरक्षित असल्याचे स्पष्ट करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योगजगताला गुंतवणुकीचे आवाहन केले. यावेळी त्यांनी लोकशाही (डेमोक्रॅसी), लोकसंख्याशास्त्र (डेमोग्राफी), मागणी (डिमांड), निर्णायकता (डिसिसिवनेस) या 4 डी फॅक्टरचे महत्त्वही पटवून दिले. ब्लुमबर्ग ग्लोबस बिझनेस फोरमच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, जगातील विविध पतमानांकन संस्थांच्या सर्वेक्षणातही भारताची पत वाढल्याचे नमूद करण्यात आले आहे. व्यवसाय सुलभतेच्या निर्देशांकामध्येही सुधारणा झाली आहे. कार्पोरेट क्षेत्र आणि संपत्ती निर्मात्यांचा आम्हाला आदर आहे. त्यामुळेच आम्ही कंपनी करात कपात केली आहे. राजकीय स्थैर्य, तत्पर धोरणे, स्वतंत्र न्यायपालिका आदी बाबींमुळे गुंतवणूकदारांना आमच्या देशात कोणताही धोका नाही. गुंतवणूकदारांना सर्वात जास्त सुरक्षेची हमी आमच्या देशात आहे. गुंतवणूकदारांसाठी आपण सेतू म्हणून काम करण्यास तयार आहोत, अशी भावनिक सादही त्यांनी जगभरातील उद्योगजगताला घातली. ते पुढे म्हणाले की, 2019 मध्ये आमच्या हाती पुन्हा सत्ता आली. दुसरी टर्म सुरू होऊन अवघे काही महिनेच झाले आहेत; मात्र त्या कालावधीत व्यापारासाठी बाधा आणणारे 50 पेक्षा जास्त असे कायदे आम्ही रद्द केले. जगभरातल्या उद्योजकांनी देशात गुंतवणूक करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले. इतकेच नाही तर भारतासोबत व्यापारासाठी हातमिळवणी करणे ही जगभरातल्या गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी ठरेल, असेही मोदींनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here