रत्नागिरी : शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना मराठी व समाजशास्त्र विषयांत अंतर्गत मूल्यमापन सुरू करण्यात आले आहे. मात्र, मराठी विषयातील व्याकरणाचे गुण कमी करण्यात आले आहेत. तर, विज्ञान आणि गणित विषयात पुन्हा एकदा पाठनिहाय गुण देण्यात आले आहेत. इयत्ता दहावीचे अंतर्गत गण बंद केल्यामुळे नापास विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले. शिवाय हुशार विद्यार्थ्यांचे गुणही कमी झाले. यावरून सरकारवर टीका झाली. यानंतर सरकारने २५ जणांची समिती नेमून अंतर्गत मूल्यमापनाचा पुन्हा आढावा घेण्याचा निर्णय घेतला. आता नव्याने काही बदल घडवण्यात आले आहेत. प्रथम भाषा मराठीमध्ये व्याकरणाचे महत्त्व कमी केले असून, चार गुणांचे व्याकरण कमी करण्यात आले आहे. यामध्ये वृत्त आणि अलंकार हे व्याकरणातून वगळण्यात आले आहेत. नववी-दहावीत पर्यायी प्रश्न नववी-दहावीतील विद्यार्थ्यांनी सर्व पाठांचा अभ्यास करावा या उद्देशाने गणित व विज्ञान विषयात पर्यायी प्रश्न बंद करण्यात आले होते. तसेच कोणत्या पाठावर किती गुणांचे प्रश्न येतील, याची माहिती विद्यार्थ्यांना देणे बंद केले होते. मात्र, आता किमान गुण व पर्यायासह विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे गुण असे दोन्ही पर्याय देण्यात आले आहेत. मराठी विषयात ३० गुणांचे पर्यायी प्रश्न असणार आहेत. तर विज्ञान आणि गणित या विषयासाठी सुमारे २० ते २५ गुणांचे पर्यायी प्रश्न असणार आहेत.
