बारावी फेरपरीक्षेत उत्तीर्णांना ‘कृषी’ मध्ये संधी

0

रत्नागिरी : राज्यात बारावीच्या जुलैमध्ये झालेल्या फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कृषी व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेशासाठी संधी मिळणार आहे. पुणे येथील महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासंदर्भात कोकण पदवीधर मतदारसंघातील आमदार निरंजन वसंत डावखरे यांनी पाठपुरावा केला होता. राज्यात बारावीच्या फेरपरीक्षांचा (पुरवणी परीक्षा) २३ ऑगस्ट रोजी निकाल लागला. मात्र, कृषी विद्यापीठांतर्गत प्रवेशप्रक्रियेची मुदत तत्पूर्वीच संपुष्टात आल्यामुळे राज्यात हजारो विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे हजारो विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले होते. या प्रश्नासंदर्भात आ. निरंजन डावखरे यांनी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे लक्ष वेधले होते. त्याचबरोबर कृषी व पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांना निवेदन दिले होते. तसेच फेरपरीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशप्रक्रिया पुन्हा राबविण्याची मागणी केली होती. या विद्याथ्यांचे वर्ष वाया जाणार नाही, यासाठी लवकरात लवकर निर्णय घेण्याचा आग्रह आ.डावखरे यांनी धरला होता. या संदर्भात प्रधान सचिव डवले यांच्याबरोबरच महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक विश्वजीत माने, शिक्षण संचालक कौसडीकर यांच्याकडे पाठपुरावा सुरू होता. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने मंगळवारी राज्यातील चार कृषी विद्यापीठात प्रवेशप्रक्रिया पुन्हा राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार राहरी, अकोला, परभणी आणि दापोली येथील कृषी महाविद्यालयात प्रवेशप्रक्रिया सुरू होणार आहे. व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांमध्ये रिक्त जागांची यादी गुरुवारी २६ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होईल. त्यानंतर ३ ऑक्टोबरपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश अर्ज दाखल करता येतील. ४ ऑक्टोबर रोजी दाखल झालेल्या प्रवेश अर्जाची यादी प्रसिद्ध होईल. त्यानंतर ९ ऑक्टोबरपासून प्रवेश फेरीला सुरुवात होईल.संस्थास्तरीय कोट्यातील रिक्त जागा संबंधित महाविद्यालयस्तरावर भरण्यासाठी ११ ऑक्टोबर ही शेवटची तारीख निश्चित करण्यात आली आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AMLEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here