इंचीऑन (दक्षिण कोरिया) : पीव्ही सिंधू, सायना नेहवाल आणि बी साई प्रणीत या स्टार खेळाडूंचा पराभव झाल्यानंतर कोरिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारतासाठी आनंदाची बातमी आहे. 33 वर्षीय भारतीय बॅडमिंटनपटू परुपल्ली कश्यपने गुरुवारी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. कश्यपने दुस-या फेरीत मलेशियाच्या लिवान डॅरेनचा 21-17, 11-21, 21-12 असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात कश्यपचा सामना डेन्मार्कच्या जान ओ जोर्गेनसेन आणि इंडोनेशियाच्या सिन्सुका जिंटींग यांच्यातील राऊंड ऑफ 16 सामन्यातील विजेत्याशी होणार आहे. मलेशियाच्या डॅरेनने आपल्या पहिल्या फेरीच्या सामन्यात चिनी लिजेंड लिन डॅनचा पराभव केला. मात्र, त्याला दुस-या फेरीत कश्यपने धूळ चारली. कॉमनवेल्थ गेम्स 2014 मध्ये सुवर्णपदक पटकाविणारा पी कश्यप हा या स्पर्धेत भारताची एकमेव आशा आहे. बुधवारी पहिल्या फेरीत विश्वविजेती पीव्ही सिंधू आणि सायना नेहवालचा पराभव झाला होता.
