ठाणे : दिवा पूर्व परिसरात महिन्याभरापूर्वी गटार साफ करण्यासाठी खुले केलेले गटार अद्यापही उघडेच आहे. त्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर साठल्याने पायी चालत जाणारी महिला गटारात पडली. परंतू वेळीच तिच्या सोबत असलेल्या महिलेने तिला हात देऊन पाण्यातून बाहेर काढल्यामुळे त्या महिलेचा जीव वाचला. दिवा विभागात रस्त्याशेजारी असलेली गटारे काही महिन्यांपूर्वी साफ करण्यात आली होती. परंतु गटाराची झाकणे लावली नसल्याने पावसाच्या पाण्यात ती दिसत नाहीत. मगळवारी दुपारी 2 वाजून 45 मिनिटांच्या सुमारास दोन महिला दिवा- आगासन रोड सिद्धिविनायक गेट समोरून पायी चालत जात होत्या. मंगळवारी रात्रीपासून सर्वत्र जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे सिद्धीविनायक गेट समोरील रस्त्यावर पावसाच्या पाण्यामुळे रस्ताच दिसत नव्हता. यामुळे दोन महिला या रस्त्याने जात असताना त्यातील एक महिला झाकण नसल्याने गटारात पडली, त्यावेळी संपूर्ण बुडाली परंतु, लगेच वरती येऊन तिने सोबत असलेल्या महिलेकडे मदतीसाठी हात पुढे केला. त्यावेळी त्या महिलेने तिला खेचून बाहेर काढल्याने तिचा जीव वाचला आहे. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. गटारे साफ सफाई करणाऱ्या संबंधीत ठेकेदाराने या गटाराच्या कामाकडे दुर्लक्ष केल्याने ही घटना घडली आहे. यामुळे या संबंधित ठेकेदारावर ठाणे मनपा आयुक्तांनी कारवाई करावी अशी मागणी दिवेकर नागरिक करत आहेत.
