नवी दिल्ली : भाजपची उमेदवार यादी अद्याप जाहीर झालेली नसली तरी पक्षाच्या विद्यमान 30 आमदारांना तिकीटवाटपात डच्चू दिला जाणार असल्याची खात्रीशीर माहिती आहे. सूत्रांकडून सांगण्यात आले की, आमदार म्हणून कामकाजाबाबत 30 जणांबद्दल पक्षामध्ये वरिष्ठ पातळीवर नाराजी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघही या 30 आमदारांवर त्यांच्या कार्यपद्धतीमुळे नाराज असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची पहिली यादी 29 सप्टेंबरला येण्याची शक्यता आहे. पितृपक्षामुळेही यादी जाहीर करण्याचे टाळले जात असल्याचे म्हटले जाते. राजधानीत पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत जागावाटपावर प्रदीर्घ चर्चा झालेली आहे. शिवसेनेसह वा शिवसेनेशिवाय अशा दोन्ही स्थितीत लढवायच्या निवडणूक तंत्राबद्दलही चर्चा या बैठकीत झाली. बैठकीला पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, खासदार पंकजा मुंडे उपस्थित होते.
