रत्नागिरी : परतीच्या पावसाचा तडाखा बसून मासेमारी करून परतणारी विनापरवाना मिनी पर्ससीन नौका मिर्या समुद्रात बुडाली आहे. बुधवारी (दि. 25) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मोठ्या लाटेच्या तडाख्यात सापडलेली ही नौका समुद्रात पलटी झाल्याने नौकेवरील खलाशांनी समुद्रात उड्या मारून दुसर्या नौकांचा आधार घेतला. त्यामुळे तेरा खलाशांचा जीव वाचला आहे. या दुर्घटनेत मिनी पर्ससीन नौकेचे मोठे नुकसान झाले आहे. दुर्घटनाग्रस्त नौका मिर्या येथील रूपेश नार्वेकर यांच्या मालकीची आहे. भैरी बुवा असे दुर्घटनाग्रस्त नौकेच नाव असून मासेमारी करण्यासाठीचा कोणताही परवाना नसताना ही नौका समुद्रात गेल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मिर्या किनार्यापासून पंधरा वाव समुद्रात मासेमारी करून परतत असताना लाटांच्या तडाख्यात बोट सापडली. समुद्रात उसळलेली महाकाय लाट नौकेच्या पाठीमागील बाजूस येऊन आदळली. लाटेच्या दणक्याने नौका समुद्रात उलटली. यावेळी बोटीवर 13 खलाशी होते. बोटीवरील मासळी आणि अन्य सामुग्री यांचे वजन अधिक झाल्याने बोट उलटल्याचे बोलले जात आहे. बुधवारी रात्री बारा वाजता बुडालेली बोट भगवती बंदर किनार्यावर गुरुवारी (दि.26) आणण्यात यश आले. यामध्ये बोटीचे व मासेमारी जाळ्यांचे नुकसान झाले आहे. मत्स्य विभागाशी या बाबत संपर्क साधला असता गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. रुपेश नार्वेकर यांची नौका बुडाल्यामुळे बोटीतील लाखो रुपयांच्या मासळीचे नुकसान झाले आहे. सुदैवाने खलाशी मात्र वाचले आहेत.
