विधानसभा निवडणुकीची लढाईची वेळ ठेपली… तरीही अनिश्‍चितता आणि अस्वस्थता

0

विधानसभा निवडणुकीची लढाईची वेळ समीप येवून ठेपली आहे. शुक्रवार 27 सप्टेंबर पासून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावधी सुरू होत आहे. मतदानाला केवळ 24 दिवस शिल्लक आहेत. तरीदेखील विद्यमान आमदार वगळता त्यांच्या समोर लढणार्‍या सर्वच इच्छूक उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. कधी नव्हे इतकी अनिश्‍चितता या विधानसभा निवडणुकीच्या रणनितीमध्ये आहे. शिवसेना वगळता भाजपासहीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आणि अगदी काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्येही उमेदवार्‍या निश्‍चित न झाल्यामुळे संभ्रमाचे वातावरण आहे. रोजच्याप्रमाणेच गुरूवारीही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष मुंबई आणि दिल्लीतील घडामोडींकडे होते. अधिकचे लक्ष दिल्लीतील घडामोडींकडे होते. कारण भाजपची कोअर कमिटीची बैठक दिल्लीत सुरू होती. त्याचवेळी काँग्रेसचे नेते उमेदवारांची यादी निश्‍चित करण्यासाठी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे गेले होते. काँग्रेसची 106 उमेदवारांची यादी निश्‍चित करण्यासाठी सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक सायंकाळी  उशिरापर्यंत सुरू होती. त्याचवेळी गुरूवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे हे भाजपाचे नेते दिल्लीत गेले होते. भाजप मुख्यालयात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, कार्याध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत बैठक झाली. ही बैठक दुपारी 2 वा. सुरू झाली होती ती सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. या बैठकीमध्ये 112 उमेदवारांच्या यादीवर चर्चा झाल्याचे वृत्त होते. या पलिकडे युतीबाबत काय निर्णय झाला? याचे कोणतेही संकेत मिळाले नव्हते. त्याशिवाय माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाबाबतही बातम्या बाहेर पडल्या नव्हत्या. त्यातच चक्क उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावधी समीप येवून ठेपला आहे. शुक्रवारपासूनच उमेदवारी अर्ज दाखल होण्याचा कालावधी सुरू होणार असून 4 ऑक्टोबर ही अंतिम तारीख आहे. त्यानंतर केवळ पंधरा दिवसात मतदान होणार आहे. मुळात निवडणूक आयोगाने यावेळी पहिल्यांदा इतका कमी कालावधी प्रचारासाठी दिला आहे. त्यातच कधी नव्हे इतका उशीर सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवार्‍या जाहीर करण्यामध्ये लावला आहे. अद्यापही शिवसेना-भाजपची युती होणार की नाही हे जाहीर झालेले नाही. त्यामुळे इतर सर्व गोष्टी अडकल्या आहेत. राणे यांचा भाजप प्रवेश हा युतीवरच अवलंबून असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. खरे तर सध्या राज्यात बॅकफुटवर असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आघाडी घोषीत करून उमेदवार जाहीर करून प्रचार यंत्रणा राबविण्यास संधी होती. परंतु तेही युती जाहीर होणार की नाही यावरच अडकले आहेत. कारण युती झाली तर प्रचंड प्रमाणात असलेल्या सर्व इच्छुकांना शिवसेना व भाजप हे पक्ष उमेदवारी देवू शकणार नाहीत. त्यामुळे यातील काही उमेदवारी न मिळालेले स्ट्राँग इच्छूक आपल्याकडे येतील आणि त्यांना उमेदवारी देवून युतीला शह देण्याची संधी मिळेल अशी अपेक्षा काँग्रेस, राष्ट्रवादीला आहे. त्यामुळे या चारही पक्षांनी युती, आघाडी जाहीर करण्यास नवरात्रोत्सवाचा काळ निश्‍चित केला आहे. या सर्व घडामोडींमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही अनिश्‍चितता आणि अस्वस्थता आहे. शिवसेनेचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि आ.वैभव नाईक हे दोन्ही उमेदवार अनुक्रमे सावंतवाडी आणि कुडाळ विधानसभा मतदारसंघातून निश्‍चित झाले आहेत. युती झाली तरी या दोन्ही जागा शिवसेनेकडे जाणार असल्याने या दोन्ही उमेदवारांनी प्रचार मोहीम जोरदारपणे सुरू केली आहे. आ.नितेश राणे यांनी निशाणी अथवा पक्ष अद्याप ठरला नसला तरी आपल्याला निवडणूक लढवायची आहे हे निश्‍चित करून त्यांनीही आपली प्रचार मोहीम सुरू ठेवली आहे. मात्र या तिघांविरोधात त्या त्यात मतदारसंघात लढणार कोण? याचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. काही स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते शिवसेनेमध्ये प्रवेश करत असले तरी स्वाभिमान पक्षाचे असे अनेक कार्यकर्ते आहेत की जे आपल्या पक्षात कट्टर आहेत. निवडणुका म्हटल्या की संघर्ष करणे आणि लढणे ही एक कार्यकर्त्याची भूक असते. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षामध्येही राणे यांचे कार्यकर्ते लढण्याचे आदेश येण्याची वाट पाहत आहेत.  परंतु लढण्याची वेळ आली तरीदेखील आदेश मिळत नसल्यामुळे त्यांच्यामधील अस्वस्थता वाढली आहे. समोरून शिवसेनेची प्रचार मोहीम सुरू असताना उरलेल्या कमी दिवसात आपल्या उमेदवाराचा प्रचार कसा करावा हा प्रश्‍न या कार्यकर्त्यांसमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे स्वाभिमान पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे लक्ष मुंबई आणि दिल्लीतील घडामोडींकडे लागले आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांचीही काहीशी अशीच अवस्था आहे. युती झाली तर कणकवलीचा मतदारसंघ भाजपला मिळणार आहेच. परंतु उमेदवार कोण? हा त्यांच्यासमोरचा प्रश्‍न आहे. एकापेक्षा अनेक नावे पुढे येत आहेत. यापैकी कुणाला संधी मिळेल आणि आपणाला कुणाला प्रचार करायला लागेल याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न भाजपचे कार्यकर्ते करत आहेत. युती झाली तर सावंतवाडीत सध्या मेहनत घेत असलेल्या माजी आ.राजन तेली यांच्या काही कार्यकर्त्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण आहेच. कुडाळमध्येही भाजपच्या कार्यकर्त्यांचीही काहीशी हीच स्थिती आहे. युती झाली नाही तर राजन तेली हे भाजपचे सावंतवाडीतील उमेदवार असतील पण कुडाळचे काय? तेथे तर अंदाज लावण्याइतपतही नावे पुढे येत नाहीयेत. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांसमोरही सुस्पष्ट चित्र दिसत नाही. युती होणार की नाही यावर आपली रणनिती ठरविणार्‍या काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षातील कार्यकर्त्यांमध्येही असेच वातावरण आहे. या दोन्ही पक्षांमधून तिनही जागांवर आघाडी झाली नाही तरी उमेदवार रिंगणात उतरण्यास इच्छूक आहेत. त्यातही राष्ट्रवादी काँग्रेसमधून उमेदवारी मिळविण्यास स्पर्धा अधिक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांना त्यांच्या रॅलींना मिळणारा प्रतिसाद आणि त्यांच्या विरोधात ईडीने दाखल केलेला गुन्हा यामुळे सरकारवरील वाढलेला रोष आपल्याला पोषक ठरेल अशी आशा राष्ट्रवादीतील इच्छुकांना वाटत आहे. यापूर्वीच्या अनेक निवडणुकांमध्ये उमेदवार्‍या जाहीर व्हायला वेळ लागला तरीदेखील उमेदवार निश्‍चित असायचा, त्यांची निशाणी निश्‍चित असायची. परंतु यावेळी उमेदवार निश्‍चित नाही. काही इच्छूक एका पक्षातून उमेदवारी नाही मिळाली तर दुसर्‍या पक्षातून उमेदवारी मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे काही इच्छूकांची निशाणीही ठरलेली नाही. निवडणुका म्हटल्या की मेळावे, बैठका या वेळेत सुरू व्हायला लागतात. अनेक इच्छुकांना तशा बैठका किंवा मेळावे घेण्याची संधीच नाही. विधानसभा निवडणूक म्हटली की उमेदवाराला गावागावात आणि वाड्यावाड्यांमध्ये जावून छोट्या मोठ्या बैठका घ्याव्या लागतात.  अशा बैठका उरलेल्या कमी कालावधीत घेणार कधी? हा प्रश्‍न उभा ठाकल्याने अनेक इच्छूकांच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here