चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा दाबून हत्या

0

आचरा : मालवण तालुक्यातील चिंदर-सडेवाडी येथील अमित दत्तात्रय मुळे (वय 30) याने चारित्र्यावर संशय घेत पत्नी अनुराधा अमित मुळे (28) हिची गळा दाबून हत्या केली. ही घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली. याबाबत अनुराधा हिचा भाऊ लक्ष्मण मनोहर घाडी (रा. त्रिंबक) यांनी आचरा पोलिस स्थानकात दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी अमित मुळे याला अटक केली आहे. अनुराधाचा भाऊ लक्ष्मण घाडीगावकर याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, आपली बहीण व चिंदर येथील अमित मुळे यांनी 9 वर्षापूर्वी पे्रमविवाह केला होता. आठ दिवसांपूर्वीच बहीण माहेरी आली होती. त्यावेळी तिने पती अमित हा आपल्या चारित्र्यावर संशय घेत असून आपणास मारझोड करतो, असे सांगितले होते. यावरून त्यांच्यात वारंवार खटके उडत असल्याची माहिती तिने आपणास सांगितली होती. यामुळे अनुराधाच्या चारित्र्यावर संशय घेत अमित याने तिची हत्या केल्याचे त्याने फिर्यादित म्हटले आहे. गुरुवारी दुपारी घडलेल्या या प्रकारानंतर अमित याने शेजारी काही अंतरावर राहणार्‍या आपल्या मोठया भावाच्या घरी जात माझ्या घरी काय झाले ते बघ, असे सांगितले असता त्याचा मोठा भाऊ व त्याची पत्नी यांनी अमितच्या घरी धाव घेतली. यावेळी अमितची पत्नी अनुराधा ही निपचित पडलेली दिसली. त्यांनी अमित समवेत तिला आचरा आरोग्य केंद्रात नेले असता आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी जाधव यांनी तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. यानंतर पोलिस कॉस्टेबल विनायक साटम यांनी अमित याला तत्काळ ताब्यात घेतले. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित मुळे याने शेजारील त्रिंबक गावातील अनुराधाशी पेे्रमविवाह केला होता. त्यांना दोन वर्षांचा मुलगाही आहे. अमित हा कामानिमित्त गेली 8 वर्षे मुंबईला राहत असे. 6 महिन्यांपूर्वी तो आपल्या चिंदर गावी पत्नीसह राहावयास आला होता. दरम्यान, अमितने आपणच पत्नीला गळा दाबून मारल्याचे कबुली आचरा पोलिसांना दिली आहे. त्याच्यावर भादंवि कलम 302  नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या घटनेचा तपास आचरा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक जे. एच. कळेकर, विनायक साटम, सुनिल चव्हाण, बाळू कांबळी करत आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर कणकवली उपविभागीय अधिकारी डॉ. नितीन कटेकर हे आचरा पोलिस ठाण्यात दाखल झाले होते.

HTML tutorial


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here