पणदूर : बेळगाव-खानापूर (गुंजी) येथील निवासी व सध्या कुडाळ सांगिर्डेवाडी येथे भाड्याने राहणारा धनंजय ज्ञानेश्वर पाटील(19) या तरूणाचा मत्स्यगंधा एक्स्प्रेसमधून उतरताना रेल्वे व प्लॅटफॉर्ममध्ये सापडून दुर्दैवी अंत झाला. ही दुर्घटना कुडाळ रेल्वे स्टेशनवर बुधवारी मध्यरात्री 2 वा.च्या सुमारास घडली. धनंजय पाटील हा 24 रोजी मुंबई येथे नोकरीसाठी मुलाखतीला गेला होता. 25 रोजी दुपारी तो मत्स्यगंधा एक्स्प्रेसने कुडाळला परत येत होता. बुधवारी मध्यरात्री 2 वा. गाडी कुडाळ रेल्वे स्टेशनवर येताच तो डब्यातून उतरत असताना रेल्वे प्लॅटफार्मवर आदळला व प्लॅटफॉर्मच्या खाली गेला. दरम्यान रेल्वे पुढे निघाल्याने तो डब्यासोबत फरफटत काही अंतर पुढे गेला. त्याला घरी नेण्यासाठी प्लॅटफार्मवर आलेला त्याचा मित्र समीर वालावलकरच्या ही गोष्ट लक्षात येताच त्याने आरडा ओरडा करत रिक्षा व्यावसायिक बाबल परब, इतर सहकारी व एका रेल्वे कर्मचार्याच्या मदतीने त्याला खेचून वर काढले. मात्र, रेल्वे डबा व प्लॅटफॉर्ममध्ये चिरडला गेल्याने धनंजयचे कमरेखालील शरीर लुळे पडले. त्याही स्थितीत तो बोलत होता. त्याला तत्काळ अॅम्ब्युलन्सने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.
मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचे निधन झाले. जिल्हा रूग्णालयात ऑक्सिजनची सुविधा नव्हती. तसेच पुढील योग्य ते उपचार झाले असते तर तो वाचला असता, असे त्याच्या मित्रांचे म्हणणे होते. ही घटना कळताच सांर्गिडेवाडीचे नगरसेवक विनायक राणे, डॉ. गिरीश राणे आदींनी रुग्णालयात धाव घेतली. त्यांचे शव सकाळी गावी हलविण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडील, दोन बहिणी असा परिवार आहे.
