नवी दिल्ली : लोकसभेत आज, गुरुवारी तिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयकाला मंजुरी मिळाली. विधेयकाच्या बाजूने ३०३ तर, विधेयकाच्या विरुद्ध ८२ मते पडली. तत्पुर्वी सभागृहात या विधेयकावर प्रदीर्घ चर्चा झाली. आता हे विधेयक मंजुरीसाठी राज्यसभेत पाठवण्यात येणार आहे. विधेयकाला विरोध करत तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी सभात्याग केला. केंद्रीय कायदा व न्याय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी आज सकाळी तिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयक लोकसभेत मंजुरीसाठी ठेवले. त्यानंतर सत्ताधारी व विरोधकांमध्ये या विधेयकावर प्रदीर्घ चर्चा झाली. काँग्रेस, डीएमके, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमुल काँग्रेस आणि जनता दल (यु) या पक्षांनी या तिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयकाला विरोध केला. पत्नीला तिहेरी तलाक देणाऱ्या पतीला तीन वर्षे शिक्षेची तरतूद या विधेयकात आहे. मात्र, राज्यसभेत संख्याबळ कमी असल्यामुळे या विधेयकाला मंजुरी मिळाली नव्हती. तिहेरी तलाक विधेयकातील गुन्हेगारी कलम (क्रिमिनैलिटी क्लॉज) वादाचा मुद्दा बनले आहे.
