मोडकाआगर पूलाचे काम ४५ दिवसांत मार्गी लागेल

0

शृंगारतळी : गुहागर-चिपळूण मार्गावरील धोकादायक बंद असलेला मोडकाआगर पूल पाडून त्याठिकाणीच नवा पूल बांधण्यात येणार आहे. पुलाचे काम ४५ दिवसांत मार्गी लागेल, असा विश्वास महामार्ग प्राधिकरणाच्या अभियंत्यांनी व्यक्त केला आहे. मोडकाआगर पुलाचे दुखणे वाहनचालकांसह सर्वसामान्य प्रवाशांना गेले दोन महिने त्रासदायक ठरले आहे. यामध्ये एसटीसह अन्य मोठ्या वाहनांच्या वाहतुकीवर याचा मोठा परिणाम होऊन वेळ व पैसा वाया जात आहे. या पुलाला पर्यायी मार्गही काढण्यात आला होता. यासाठी पालकमंत्र्यांनी २० लाख रूपये मंजूर करून पर्यायी मार्गाची पाहणीही केली होती. मात्र, पर्यायी मार्गही बारगळला असून नवीन मोडकाआगर पूल बांधणे हाच एकमेव पर्याय आहे. मोडकाआगर पुलाचा आराखडा तयार करण्यात आला. मात्र, पुलाची उंची किती ठेवायची यावर घोडे अडून आहे. उंची वाढणार असेल तर मूळ निविदेच्या रक्कमेव्यतिरिक्त अतिरिक्त रक्कम कुठून खर्ची घालायची यावर तांत्रिक बाबी अडून आहेत. मात्र, यावर लवकरच तोडगा निघणार असून पुलाच्या कामाला सुरूवात होणार आहे. मुख्य काम पिलर टाकण्याचे असून त्यावर क्रेनच्या सहाय्याने तयार काँक्रिटचा थर टाकण्यात येणार आहे. त्यामुळे पुलाच्या कामाला वेळ लागणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या मोडकाआगर पुल वाहतुकीस बंद असल्यामुळे येथील रस्त्याच्या दोन्ही बाजूची झाडे तोडून रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. मोडकाआगर-शृंगारतळी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे रूंदीकरणाला येथूनच सुरूवात होणार आहे. रूंदीकरणाबाबत मार्गताम्हाने, रामपूर, गुहागर आदी भागात मोठा अडसर आहे. घरे व बाजारपेठांना धक्का पोहोचणार असल्याने तेथील ग्रामस्थांचा रूंदीकरणास विरोध आहे. मुळात रस्त्याच्या दोन्ही बाजूने शासनाची जागा असताना अटकाव होत आहे. त्यामुळे रस्ता रुंदीकरणात अडचणी येत असून जनतेने सहकार्य करावे, असेही आवाहन अभियंत्यांनी केले आहे. या पुलावरुन छोटे वाहनचालक व प्रवासी यांची थोडीफार गैरसोय टळली आहे. मात्र, मूळ पुलाचे बांधकाम पाडूनच तेथे नवीन पूल बांधण्यात येणार असल्याने वाहतुकीला पूर्णपणे खीळ बसणार आहे. त्यामुळे नवीन पूल होईपर्यंत सर्वच वाहनांना वळसा मारून इतर मार्गाचा आधार घ्यावा लागणार आहे.




LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here