मिऱ्या-नागपूर मार्गासाठी दुसऱ्या टप्प्यात भूसंपादन

0

रत्नागिरी : कोकणला पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाला जोडणाऱ्या मिऱ्या-नागपूर मार्गासाठी रत्नागिरी ते कोल्हापूर 134 किलोमीटरच्या मार्गाचे राहिलेले भूसंपादन येत्या दोन महिन्यात सुरू होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने गॅझेट प्रसिद्धीस देऊन 25 जानेवारीपर्यंत हरकती मागविल्या आहेत. सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी असा दुसरा टप्पा निश्चित करण्यात आला; मात्र यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील किरकोळ भूसंपादन राहिले आहे. कुवारबावची भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली असून थ्रीडी (जमीन अधिग्रहण करण्याचे निश्चित) झाला आहे. जिल्ह्यातील भूसंपादन प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. मिऱ्या नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेली 12 वर्षे रखडले होते. या दुसऱ्या टप्प्याच्या भूसंपादनानंतर त्याला गती मिळणार आहे. नागपूर ते रत्नागिरी असा 548 किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग व्हावा, अशी मागणी 2001 पासून सुरू आहे पण मार्च 2013 मध्ये याची अधिसूचना जारी झाली. खऱ्या अर्थाने राज्य मार्गाचे रूपांतर चौपदरी महामार्गात करण्यासाठी सर्वेक्षण सुरू आहे. तुळजापूर, लातूर, अहमदपूर, नांदेड, यवतमाळ, वर्धा, बुटीबोरी एमआयडीसी, नागपूर असा पहिला टप्पा तर सोलापूर, सांगोला, कोल्हापूर, रत्नागिरी असा दुसरा टप्पा निश्चित करण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने 2015 मध्ये यासाठी 1500 कोटीच्या निधीची तरतूद झाली. त्याचे काम सुरू आहे. दुसऱ्या टप्प्याचेही काम मिरजपर्यंत सुरू आहे पण चोकाक ते रत्नागिरी हे काम अजून भूसंपादनातच अडकले आहे. यापूर्वी दोनवेळा भूसंपादनास सुरवात झाली पण कंपनीकडून योग्य मोबदला दिला जात नसल्याने शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी भूसंपादनास विरोध केला. आता पुन्हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने गॅझेट प्रसिद्ध देऊन काही हरकती असल्यास कळवावे अन्यथा काम सुरू केले जाईल, असे कळविले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:10 PM 23-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here