मी ईडी कार्यालयात जाणार नाही; शरद पवार

0

मुंबई : राज्य सहकारी बँकेच्या २५ हजार कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणाच्या चौकशीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज दुपारी स्वतः सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या कार्यालयात जाणार होते. मात्र, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असल्याचे सांगत शरद पवार यांनी तूर्तास ईडीच्या कार्यालयात जाण्याचा निर्णय तहकूब केला. त्यांनी आज दुपारी पत्रकारांशी बोलताना आपला हा निर्णय जाहीर केला. शरद पवार हे आज, शुक्रवारी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) बेलार्ड पियर येथील कार्यालयात जाणार असल्याने बंदोबस्त वाढविला होता. तसेच मुंबई पोलिसांनी डोंगरी, जे. जे. मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स, कफ परेड, कुलाबा आणि मरीन ड्राइव परिसरात जमावबंदीचे आदेश लागू केले होते. दरम्यान, मुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकाराशी बोलताना शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आपल्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे माझ्या एका कृतीमुळे मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे तृर्तास ईडीमध्ये जाण्याचा माझा निर्णय तहकूब करत आहे, असे शरद पवार यांनी सांगितले. विशेष म्हणजे शरद पवार यांनी आपल्याला पाठिंबा दिल्याबद्दल काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि शिवसेनेचे आभार मानले. प्रतिबंधात्मक नोटीस बजावण्यात आल्याने पवार यांनी ईडी कार्यालयात न जाण्याची विनंती पोलिस आयुक्तांनी केली. त्यानंतर शरद पवार यांनी ईडीमध्ये न जाण्याचा निर्णय जाहीर केला. राज्य सहकारी बँकेच्या २५ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी शरद पवार यांच्यावर सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या सोबतच राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ७० सर्वपक्षीय संचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी आज शरद पवार ईडी कार्यालयात जाणार होते.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here