रत्नागिरी : सरकारी कामात अडथळा आणून वीज बिलाची थकीत वसुली करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याप्रकरणी तिघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवार २५ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वा. सुमारास मिरकरवाडा येथील खडप मोहल्ला येथे घडली. इशान इशामुद्दीन बाबामियाँ मुल्ला (रा. खडप मोहल्ला, रत्नागिरी) आणि इतर दोन महिला यांच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या विरोधात महावितरणचे कर्मचारी मेहबुब राजबकर सय्यद (१९, रा. झाडगाव, रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार, मंगळवारी दुपारी अतिरिक्त कार्यकारी अभियंता शहर उपविभाग यांच्या आदेशाने मेहबुब सय्यद हे आपल्या टीमसह मिरकरवाडा येथे थकित वीज बिल वसूल करण्यासाठी गेले होते. तीन महिन्यांचे थकित बिल आता भरणार असलास तर मिटर कट करणार नाही असे मेहबुब सय्यद सांगितले. त्यावर इशान मुल्लाने ‘मी आता पैसे भरणार नाही’ असे सांगितले. त्यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी त्याच्या घराचा विद्युत पुरवठा खंडित केला. याचा राग आल्याने मुल्ला आणि अन्य दोन महिलांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत त्यांच्या सरकारी कामात अडथळा निर्माण करून धक्काबुक्की केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.
