रमेश कदम यांचा पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश

0

चिपळूण : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार तसेच ज्येष्ठ नेते खा.सुनील तटकरे यांनी आपल्याजवळ संपर्क करून राष्ट्रवादीत पुन्हा सन्मानाने या अशी विनंती केल्यामुळे मी पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश करीत असल्याची माहिती माजी आमदार व काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश कदम यांनी गुरुवारी (दि.२६) पत्रकार परिषदेत दिली. यामुळे जिल्हा काँग्रेसला धक्का बसला आहे. ते म्हणाले, गेली चाळीस वर्षे आपण राजकीय क्षेत्रात आहोत. या वाटचालीत अनेकवेळा संघर्ष केला. नगरसेवक, नगराध्यक्ष ते आमदार असा यशस्वी प्रवास कार्यकत्यांच्या बळावर केला. राष्ट्रवादीची स्थापना झाल्यावर पक्षाध्यक्ष पवार यांनी आपल्यावर जिल्ह्याची जबाबदारी सोपवली. कमी वेळेत पक्ष जिल्ह्यात बळकटीने उभा केला. दरम्यान, पक्षांतर्गत अनेक घडामोडी झाल्या. त्यामुळे पक्ष सोडावा लागला. त्या काळात वैयक्तिक अडचण कोणामुळे झाली नाही. मात्र, त्याचा फटका संघटनेला बसत होता. ज्या पक्षात गटबाजी असते तो पक्ष बळकट होत नाही, काँग्रेसमध्ये असताना हेच अनुभवले. नेते प्रदेश पातळीवर बसून फोनवरुन पक्ष चालवित होते. त्यातूनच गटबाजी निर्माण होत होती. आपण तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये काम करणारा असल्याने पदापेक्षा कार्यकर्ता महत्त्वाचा आहे. आपण कधीही गटबाजी मानली नाही. पक्षाचे प्रामाणिक काम करीत आलो आहे. गटबाजीमुळे संघर्ष झाला तर पक्ष वाढत नाही हे अनुभवले आहे. ते पुढे म्हणाले, मध्यंतरात शरद पवार व तटकरे यांचा माझ्याशी संपर्क झाला. त्यांनी राष्ट्रवादीत परत या असे आवाहन केले. मी शरद पवारांवर प्रेम करणारा कार्यकर्ता आहे. शरद पवार यांचे वय झाले असतानाही पवार हे समोर आलेल्या अडचणीतून राज्यभर निवडणूक प्रचारात सहभागी झाले आहेत. त्यांच्या अडचणीच्या काळात त्यांच्यासोबत राहणे, त्यांना साथ देणे हे माझे कर्तव्य समजतो. यातूनच मी पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश करणार असून निवडणुकीनंतर अधिकृत प्रवेश सोहळा होईल. माझ्यासोबत राष्ट्रवादीत आलेले काँग्रेसमधील विद्यमान पदाधिकारी व कार्यकर्ते देखील पुन्हा राष्ट्रवादीत येणार आहेत. त्यांना राष्ट्रवादीत सन्मानजनक पदे देण्याचे आश्वासन खा, पवार व खा. तटकरे यांनी दिले आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार शेखर निकम यांच्यासाठी संपूर्ण मतदारसंघात प्रचार दौऱ्यातील बैठकांचे नियोजन करुन प्रचारात सहभागी होणार आहे, असे कदम यांनी सांगितले.

HTML tutorial


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here