रत्नागिरी : इंदीरा आवास योजनेतून घरकुल बांधणीसाठी पहिला हफ्ता घेऊनही घर बांधणीचे कामही सुरू न करणाऱ्या लाभाथ्यांविरोधात रत्नागिरी पंचायत समितीने कडक पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. निधी घेऊन घर न बांधणाऱ्या २१ लाभार्थ्यांकडून वसुलीची मोहीम हाती घेण्यात आली असून या लाभार्थ्यांकडून घरबांधणीसाठी जमा केलेला पहिला हफ्ता परत घेण्याची कारवाई हाती घेण्यात आली आहे. आतापर्यंत १६ लाभार्थ्यांकडून वसुली पूर्ण करण्यात आल्याची माहिती पंचायत समिती बीडीओ टी. बी. जाधव यांनी दिली. स्वतःचे घर नसणाऱ्यांना हक्काचे घरकुल असावे यासाठी केंद्र शासनाने इंदीरा गांधी आवास योजना हाती घेतली. या योजनेतुन बेघरांना घरे देण्याची मोहीम आखण्यात आली. रत्नागिरीतही बेघरांना घरे देण्यासाठी काम सुरू झाले. इंदीरा आवासचे लाभार्थी ठरवण्याचा अधिकार पूर्वी ग्रामसभांना होता. ग्रामसभेने मान्यता दिल्यानंतर संबंधिताचा समावेश लाभार्थी यादीत होत होता. घरकुलाच्या कामाचे फोटो अपलोड केल्यानंतर टप्प्याटप्प्याने घरकुल बांधणीसाठी निधी येत होता. यामध्ये शौचालयासाठी १२ हजार, एमआरईजीएस अंतर्गत १८ हजार २०० असा एकूण दीड लाखाचा निधी लाभार्थ्यांना घरकुल बांधणीसाठी देण्यात येतो. घरकुल मंजुरीचे आदेश मिळाल्यानंतर तत्काळ लाभार्थ्याच्या खात्यात पहिल्या हफ्त्यापोटी ३५ हजाराची रक्कम तत्काळ जमा करण्यात येत होती. परंतु, अनेकदा घरकुल बांधण्यासाठी पहिला हफ्ता घेऊनही लाभार्थी घरकुल बांधणी न करता संबंधित रक्कमेची परस्पर विल्हेवाट लावण्याचे प्रकार वाढीस लागले होते. यामुळे घरकुल बांधणी योजनेचा आढावा घेण्याचे काम प्रशासन स्तरावरून सुरू होते. रत्नागिरी पंचायत समितीने घेतलेल्या आढाव्यामध्ये अनेक लाभार्थ्यांनी घरकुल बांधणीसाठी निधी घेऊनही तो खर्च केला नसल्याची बाब समोर आली. इंदीरा आवास योजनेतून सन २०१५-१६ मध्ये ५२५ घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. यापैकी ३३३ घरकुले बांधुन पूर्ण करण्यात आली. परंतु, यापैकी १६ लाभार्थ्यांनी घरकुल बांधणीसाठी पहिला हफ्ता घेऊनही घराच्या बांधकामाला हात घातला नसल्याचे समोर आले आहे. तर सन २०१६-१७ मध्ये पाच जणांनी अशाच पध्दतीने निधी घेतला परंतु, घर बांधकाम सुरू केलेले नाही. दोन वर्षात २१ जणांपैकी १८ जणांकडून पहिला हफ्ता परत घेण्यात आला आहे. यानंतरही ही कारवाई सुरूच ठेवण्यात येणार आहे.
