औरंगाबाद : विधानसभा कार्यकाळ संपुष्टात येण्यासाठी काही दिवसांचा कालावधी बाकी असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अजित पवार यांनी राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. विधानसभा सभापती हरिभाऊ बागडे यांनी अजित पवारांचा राजीनामा मंजूर केला आहे. दरम्यान, त्यांनी राजीनामा का दिला? हे अद्याप समजू शकलेले नाही. अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा ईमेल पाठवून दिला आहे आणि तो स्वीकारण्यातही आला. विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ अद्यापही ९ नोव्हेंबरपर्यंत आहे. त्यामुळे काही दिवसांचा कालावधी राहिला असतानाच त्यांनी राजीनामास्त्र उपसल्याने चर्चेला उधाण आले आहे. राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी अजित पवार यांच्यावरही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, त्यांनी राजीनामा दिल्यानंतर अजित पवार यांचा फोन स्वीच ऑफ असल्याची माहिती आहे.
