कुडाळ एमआयडीसी कार्यालयासमोर आमरण उपोषण

0

कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या घनकचरा निर्मूलन प्रकल्पाला एमआयडीसीने दिलेली स्थगिती तत्काळ उठवावी आणि भूखंड न.पं.च्या ताब्यात द्यावा, या मागणीसाठी कुडाळ न. पं. नगराध्यक्षांसह नगरसेवकांनी गुरुवारपासून एमआयडीसी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले. प्रशासनाकडून आम्हाला थातूरमातूर उत्तरे नको, एमआयडीसीने यापूर्वी जो प्लॉट दिला होता, त्या प्लॉटवरील स्थगिती उठवावी, तोपर्यंत हे उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी केला आहे. या उपोषणाला विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांसह सामाजिक संस्था व नागरिकांनी पाठिंबा दर्शविला असल्यामुळे घनकचरा प्रकल्पाचा प्रश्‍न आता पुन्हा पेटला आहे. नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या ताठर भूमिकेमुळे एमआयडीसी प्रशासनाची कोंडी झाल्याचे दिसून येत असून आता एमआयडीसी प्रशासन कोणता निर्णय घेतील, याकडे कुडाळवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. कुडाळ न.पं.च्या घनकचरा निर्मूलन प्रकल्पासाठी न.पं.ने एमआयडीसीकडे भूखंडाची मागणी केली होती. त्यानुसार एमआयडीसीने भूखंड क्र. 171 मधील प्लॉट न. पं. ला  दिला होता. मात्र, त्यानंतर नेरूर, पिंगुळी प्र्र्रकल्पग्रस्त, ग्रामस्थांनी त्याला तीव्र विरोध दर्शविला. त्यामुळे एमआयडीसीने या प्रकल्पाला स्थगिती दिली. दरम्यान, कुडाळ नगराध्यक्षांसह सत्ताधारी नगरसेवकांनी महिन्याभरापूर्वी उपोषण छेडत ही स्थगिती उठवून प्लॉट ताब्यात देण्याची मागणी एमआयडीसी प्रशासनाकडे केली होती. दुसरीकडे, नेरूर-पिंगुळी प्रकल्पग्रस्त, ग्रामस्थांनीही या प्लॉटला परवानगी देऊ नये, अशी मागणी उपोषणाद्वारे केली होती. पालकमंत्री  दीपक केसरकर यांनी उपोषणकर्त्यांशी संपर्क साधून याबाबत लवकरच उद्योगमंत्र्यांसमवेत बैठक आयोजित करून तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे याप्रश्‍नी बैठक झाली. या बैठकीला पालकमंत्री दीपक केसरकर, आ. वैभव नाईक, नगराध्यक्ष ओंकार तेली, नेरूर सरपंच शेखर गावडे आदींसह एमआयडीसीचे अधिकारी उपस्थित होते. मात्र, त्या बैठकीतही सकारात्मक तोडगा निघाला नाही.  परिणामी नगराध्यक्ष ओंकार तेली यांच्यासह सत्ताधारी नगरसेवकांनी गुरूवारपासून पुन्हा एकदा उपोषणाचा  मार्ग अवलंबिला आहे. त्यामुळे आता एमआयडीसी प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे. या उपोषणात नगराध्यक्ष ओंकार तेली, उपनगराध्यक्ष सौ. सायली मांजरेकर, नगरसेविका सौ.संध्या तरेसे, सौ. साक्षी सावंत, सौ.अश्‍विनी गावडे, सौ. सरोज जाधव, नगरसेवक आबा धडाम, सुनील बांदेकर, विनायक राणे, राकेश कांदे यांनी सहभाग घेतला आहे. राष्ट्रवादीचे माजी मंत्री भास्कर जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष प्रसाद रेगे,तालुकाध्यक्ष भास्कर परब, प्रांतिक सदस्य अमित सामंत, प्रफुल्‍ल सुद्रिक, मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, कुडाळ स्मार्ट फोरमचे अध्यक्ष गजानन कांदळगावंकर, रोटरी अध्यक्ष एकनाथ पिंगुळकर, राजन बोभाटे, भाई साटम, नगरसेवक एजाज नाईक, आत्माराम ओटणेकर, अजय आकेरकर, दीपक नारकर, मंगेश तळवणेकर,प्रसाद शिरसाट, आनंद शिरवलकर, अनुप तेली, प्रमोद भोगटे, बाबल गावडे, रूपेश कानडे,अ‍ॅड. सुधीर भणगे,स्वरूप सावंत,दीपक गावडे, रेखा काणेकर, शिवराम शिरसाट, अविनाश पाटील,संजय पिंगुळकर,मंदार शिरसाट आदींसह विविध पक्ष व सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व नागरिकांनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला. एमआयडीसीचे उपअभियंता अविनाश रेवंडकर यांनी उपोषणकर्त्यांशी भेट घेऊन चर्चा केली. वरिष्ठ अधिकार्‍यांशी याबाबत चर्चा झाली असल्याचे सांगितले. मात्र यात तोडगा न निघाल्याने उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी घेतला. माजी मंत्री भास्कर जाधव यांची भेट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री भास्कर जाधव यांनी या उपोषणाला भेट देत नगराध्यक्ष ओंकार तेली यांच्याशी चर्चा केली. याप्रश्‍नी आपणही वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करून मार्गी लावण्याच्या दृष्टीने सहकार्य केले जाईल, असे त्यांनी सांगितले. या उपोषणाकडे शिवसेना-भाजप नगरसेवकांनी पाठ फिरवली. गुरूवारी  सायंकाळपर्यंत उपोषण सुरूच होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here