४ ऑक्टोबर रोजी करणार उमेदवारी अर्ज दाखल
रत्नागिरी : प्रचंड जनसंपर्क, विकास कामांचा धडाका, उत्तम संघटन कौशल्य, शिवसेनेची गावागावातून असणारी संघटनात्मक बांधणी, बंधू किरण सामंत आणि वडील अण्णा सामंत यांचा गावागावातून असणारा प्रचंड संपर्क या सर्वांच्या जोरावर रत्नागिरीचे विद्यमान आमदार उदय सामंत आपल्या आमदारकीची चौथी ईनिंग खेळण्यास सज्ज झाले आहेत. ४ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. संपूर्ण मतदारसंघालाच आ. उदय सामंत यांच्या विजयची खात्री असल्याने हि लढत म्हणजे केवळ एक औपचारिकता ठरणार आहे. एकंदर शिवसेनेच्या संघटनात्मक ताकदीवर आमदार उदय सामंत आपल्या विजयचा चौकार ठोकण्यास सज्ज झाले आहेत.
२००४ पासूनच्या विजयात हजारो मतांची भर आमदार उदय सामंत यांनी आपल्या कामांच्या जोरावर पदरात पडून घेतली. २०१४ च्या निवडणुकीत ४० हजाराचे मताधिक्य मिळवत आमदार सामंत विजयी झाले होते आणि याच मतदार संघातून नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत खा. विनायक राऊत यांना ६० हजाराचे मताधिक्य देऊन संपूर्ण जिल्हाभरात आमदार सामंत सरस ठरले. संपूर्ण मतदारसंघाचा अभ्यास करता आमदार सामंत यांना टक्कर देणारे दुसरे कोणतेही नेतृत्व आजतागायत तयार न झाल्याने यावेळी देखील दणदणीत विजय संपादन करीत आमदार आपल्या विजयाचा चौकार अतिशय सहजरीत्या ठोकतील असे गल्लीतला शेंबडा पोर देखील सांगत आहे.
तरीही गाफील न राहता मताधिक्य वाढवण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली असून विभागवार बैठकांना सुरुवात झाली आहे. प्रचाराचा एक भाग म्हणून सोशल मिडीयावर तब्बल तीन प्रचार गीते प्रसारित करण्यात आली आहेत. जिंकणे हि केवळ औपचरिकता आहे असे जरी सर्वांना ज्ञात असले तरी आमदार उदय सामंत यांच्या विरोधात लढण्यासाठी काहींनी तयारी देखील सुरु केल्याची माहिती मिळत आहे.
४ ऑक्टोबर रोजी आमदार उदय सामंत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून यावेळी शक्ती प्रदर्शन करण्यासाठी शिवसेनेने जय्यत तयारी सुरु केली आहे. या दिवशी अभूतपूर्व गर्दीने आमदार सामंत आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.
