गोवा बनावटीची सुमारे 6 लाखांची दारू जप्‍त

0

वैभववाडी : गोव्याहून मुंबईकडे जाणार्‍या पावलू या खासगी आराम बसमध्ये गोवा बनावटीची सुमारे 6 लाख 4584 रु. किमतीची दारू आढळून आल्यामुळे वैभववाडी पोलिस व निवडणूक भरारी पथकाने आराम बससह सुमारे 20 लाख 54 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरुवारी मध्यरात्री 2.30 वा. सुमारास करूळ चेक पोस्ट नाक्यावर केली. याप्रकरणी आराम बसचालकांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. विधानसभा निवडणूक पार्श्‍वभूमीवर गुरुवारी रात्री निवडणूक भरारी पथक व वैभववाडी पोलिस करूळ चेक नाक्यावर वाहानांची कसून तपासणी करीत होते. मध्यरात्री पावलू कंपनीची खासगी आराम बस नाक्यावर आली असता, बस थांबवून बसची तपासणी करण्यात आली. बसच्या डाव्या डिकीमध्ये खाकी रंगाच्या पुठ्ठ्याचे बॉक्स दिसून आले. चालकाकडे याबाबत चौकशी केली असता, बाक्समध्ये बाथरुम क्लिनर पावडर व लिक्वीड असल्याचे सांगितले. पोलिसांनी यातील एक बाक्स उघडून पाहीले असता, त्यामध्ये रॉयल चलेंज व्हिस्की असे इंग्रजीमध्ये लेबल असलेली गोवा बनावटीची 2 लिटरची प्लास्टिक बॉटल आढळून आली.पोलिसांनी सर्व 16 बाक्सची तपासणी केली असता,  सर्व 16 बाक्समध्ये गोवा दारू मिळून आली.याबाबत चालक अफजल हुसेन सय्यद (43, रा. प्रतापगड-अफजलखान कबर ता. महाबळेश्‍वर, जि. सातारा) व दुसरा चालक शमशद इद्रीश खान (48, रा. तुळशीवाडी झोपडपट्टी, ताडदेव-मुंबई) या दोघांनी ही दारू आपलीच असून गोवा येथून मुंबईला घेऊन जात असल्याचे सांगितले. याबाबत वैभववाडीचे स.पो.नि. दत्तात्रय बाकारे यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचा समक्ष पंचनामा केला. बाजार भावानुसार या दारूची किेमत 6 लाख 4584 रु. आहे. पोलिसांनी 16  बॉक्समधील 2 हजार मिलीच्या एकूण 243 गोवा दारूच्या सीलबंद बाटल्या तसेच सुमारे 14 लाख 50 हजार रुपये किंमतीची जुनी आराम बस असा सुमारे 20 लाख 54 हजार 584 रु.मुद्देमाल जप्त केला. दोन्हीही चालकांवर महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमनुसार गुन्हा नोंद करण्यात आली आहे.  ही कारवाई पो.काँ.कृष्णात लक्ष्मण पडवळ , पो.का.सोनटक्के, तर  निवडणूक सर्व्हेशन पथकाचे अमोल बबुवान पाटेकर, सौरभ भगवान पाटील, प्रकाश बाबू लांबोर, रवींद्र भिकाजी देवरुखकर, वाहन चालक संतोष ज्ञानदेव साटम, अविनाश पाटील यांनी ही संयुक्‍तपणे कारवाई केली.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here