कोल्लम (केरळ) : पाकिस्तान मोठा हल्ला घडविण्याच्या प्रयत्नात आहे. पाकमध्ये प्रशिक्षण घेतलेले दहशतवादी समुद्रामार्गे हल्ला करू शकतात, अशी शंका संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे तटरक्षक दल आणि समुद्र सुरक्षा यंत्रणांकडून सतर्कता पाळली जात आहे. नौदल अशा कुठल्याही संकटाला भिडण्यासाठी पूर्णतः सक्षम आहे, असेही सिंह म्हणाले. आध्यात्मिक गुरू माता अमृतानंदमयी यांच्या 66 व्या वाढदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, जे आम्हाला त्रास देतील त्यांना आम्ही सुखाने जगू देणार नाही. शेजारी देशाचे दहशतवादी किनार्यावर मोठा हल्ला करू शकतात. आमचा किनारा कच्छपासून केरळपर्यंत पसरला आहे. मात्र, देशाची समुद्री सीमा पूर्णतः मजबूत आहे. आम्ही किनारी आणि समुद्री सुरक्षेसाठी कटिबद्ध आहोत. ते म्हणाले, देशातील कुणीही नागरिक शहीद सैनिकांना विसरू शकत नाही. पुलवामातील हल्ल्यानंतर हवाई दलाने पाकिस्तानच्या बालाकोट येथे हवाई हल्ला केला. आम्ही कुणाला त्रास देत नाही. मात्र, जर कुणी आम्हाला त्रास देत असेल तर आम्ही त्याला सुखाने जगू देणार नाही.
