रत्नागिरी : गेले पाच-सहा दिवस सातत्याने कोसळणारा पाऊस व समुद्राकडून जमिनीकडे वाहणार्या वार्याचा वेग वाढल्यामुळे समुद्राला उधाण आले असून, समुद्र खवळलेला आहे. त्याचा फटका मिर्या बंधार्याला बसत आहे. मुरुगवाडा ते जाकिमिर्या बंधार्याचे दगड ठिकठिकाणी वाहून गेले आहेत. मुरुगवाडा येथील बंधार्याचे दगड ढासळले आहेत. त्यामुळे अमावस्येच्या उधाणात मोठा भाग वाहून जाण्याची भीती परिसरातील ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. यंदा पावसाने उशिरा सुरुवात केली असली तरीही समुद्राच्या उधाणाने मिर्या बंधार्याला दणका दिला आहे. मोठ्या आणि उंच लाटा वेगाने बंधार्यावर आपटत असल्याने बंधार्याचे दगड ढासळत आहेत.गेल्या चार दिवसात लाटांचा जोर वाढला आहे. काही दिवसांवर गटारी अमावस्या येऊन ठेपली आहे. प्रचंड लाटांमुळे पांढरा समुद्र येथील बंधारा वाहून अर्धा रस्ता धूपून गेला आहे. माती आणि वाळूच्या भरावावर रस्ता केल्याने त्याच्या दर्जावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रस्ताही खचण्याच्या मार्गावर वेगवान वार्यामुळे लाटांच्या तडाख्याने रस्ता वाहून गेला. तिथे तात्पुरती डागडुजी पतन विभागाकडून करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी वाहून गेलेल्या भागाच्या अलीकडील रस्ताही खचण्याच्या मार्गावर आहे. काही भागाला भेगा पडल्या आहेत. अमावास्येच्या उधाणावेळी त्या रस्त्याची व बंधार्याची दुरवस्था होण्याची शक्यताही आहे. पाणी अडवण्यासाठी टेट्रापॉड टाकणे आवश्यक आहे.
