देवरुख : अज्ञात वाहनाची जोराची धडक बसून वृध्देचा मृत्यू झाल्याची घटना मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वर येथे बुधवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. नजमून नूर खान असे मृत झालेल्या वृध्देचे नाव आहे. याबाबत संगमेश्वर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, नजमुन नुर खान (७४, रा. रामपेठ, संगमेश्वर ) या बुधवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वर येथील मुळ्ये स्टाँप येथे महामार्ग ओलांडत असताना अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात नजमुन गंभीर जखमी झाल्या. त्यांना लागलीच प्राथमिक उपचारासाठी संगमेश्वर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती नाजुक बनल्याने त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे नेण्याचासल्लाडॉक्टरांनी दिला. यानुसार त्यांना रत्नागिरीत नेत असतानाच त्यांचे निधन झाले. नजमुन नूर खान यांचे पतीनूर युसूफ खान यांनी दिलेल्या फिर्यादिवरून संगमेश्वर पोलीसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास संगमेश्वर पोलीस करीत आहेत. मुंबईगोवा महामार्गावर चौपदरीकरणाचे अर्धवट काम असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
