संयुक्त राष्ट्रे : दहशतवादाचा धोका केवळ भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला सतावत आहे. मानवतेला हे मोठे आव्हान असून, त्याचा सर्वांनी संयुक्तपणे मुकाबला करण्याची गरज असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेत सांगितले. भारताने जगाला युद्ध नव्हे तर बुद्ध दिला आहे. त्यामुळे संपूर्ण जगाला दहशतवादाबाबत जागरुक करण्याचे काम आपण करीत आहोत. संयुक्त राष्ट्र संघामध्ये मनोगत व्यक्त करण्याची संधी विशेष आहे. भारत महात्मा गांधी यांची 150 वी जयंती साजरी करीत आहेत. महात्मा गांधी यांनी जगाला अहिंसेचा मंत्र दिला. त्यांनी दिलेला सत्य आणि अहिंसेचा मंत्र आजही लागू पडतो. आज त्याचीच सर्व विश्वाला गरज आहे. दहशतवादाने आजवर काहीच साध्य झालेले नाही. हेे दहशतवादाचा पुरस्कार करणार्या देशांनी लक्षात घ्यायला हवे, असे म्हणत पाकिस्तानला खडेबोल सुनावले. यावर्षी जागतिक स्तरावरील सर्वांत मोठी निवडणूक पार पडली. जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही देशाने पुन्हा एकदा माझे सरकार निवडून दिल्याचे सांगताना मोदी म्हणाले, भारतात स्वच्छता अभियानाला गेल्या पाच वर्षांत महत्व दिले. 11 कोटी शौचालये उभारली. 50 कोटी नागरिकांना मोफत उपचाराची संधी प्राप्त करून दिली. आगामी काळात 15 कोटी घरांमध्ये पाणी पोहोचणार असून, 2025 पर्यंत क्षयरोगमुक्त भारत करण्याचे आपले उद्दिष्ट आहे. याशिवाय प्लास्टिकचाही धोका दहशतवादासारखाच आहे. त्यामुळे आगामी काळात प्लास्टिक मुक्त अभियानावर भर देण्यात येणार आहे. ग्लोबल वॉर्मिंगवर मोठे काम करायचे आहे. असेही मोदी म्हणाले.
