रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या डबल डेकर एक्स्प्रेसला पुढील चार महिन्यांसाठी चार डबे वाढवण्यात आल्याने आता ही वातानुकूलित दुमजली ट्रेन ८ ऐवजी १२ डब्यांची धावणार आहे. कोकण रेल्वे मार्गावर मुंबई ते गोव्या दरम्यान प्रवाशांची रेल्वे गाड्यांना असलेली पसंती लक्षात घेऊन मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या डबल डेकर एक्स्प्रेसला वातानुकूलित थ्री टायरचे तीन तर टू टायरचा एक असे चार अतिरिक्त डबे जोडण्यात येणार आहेत. सध्या ही गाडी डबल डेकर चेअरकार आठ डब्यांसह धावते. त्यातील ६ डबे प्रवाशांसाठी तर दोन डबे जनरेटर कारसाठी वापरले जातात. आता यामध्ये सिंगल डेकचे चार डबे वाढवण्यात आले आहेत. यानुसार ११०९९/१११०० तसेच ११०८५ तसेच ११०८६ या दोन्ही गाड्यांना ११ जानेवारी २०२० पर्यंत हे अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार ११०९९/१११०० या डबल डेकरला २८ सप्टेंबर २०१९ ते ११ जानेवारी २०२० या कालावधीत तर ११०८५/११०८६ डबल डेकर एक्स्प्रेसला ३० सप्टेंबर २०१९ ते ८ जानेवारी २०२० या कालावधीत चार अतिरिक्त जोडले जाणार आहेत.