‘खिशात नाही आणा अन् बाजीराव म्हणा…’, अर्थसंकल्पावर संजय राऊतांचा घणाघात

0

नवी दिल्ली अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी 2021-22 या वर्षांचा देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी कोरोना कालावधीत आणि लॉकडाऊन दरम्यान सरकारनं केलेल्या कामगिरीची माहिती दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीचा अर्थसंकल्प हा वेगळा होता. यावेळी कोणत्याही कागदपत्रांशिवाय टॅबच्या सहाय्यानं हा अर्थसंकल्प मांडण्यात आला. सुरुवातीलाच आरोग्य खात्यामधील बजेट सादर करताना, तब्बल 137 टक्क्यांची वाढ आरोग्य विभागाच्या बजेटमध्ये झाल्याचं त्यांनी सांगितलं. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर विरोधकांनी सरकारवर टीका केलीय. शिवसेना नेते संजय राऊत यांनी ‘खिशात नाही आणा अन् बाजीराव म्हणा…’ असा घणाघात केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर केलाय.

केंद्र सरकार महाराष्ट्राचं देणं लागते, पण महाराष्ट्राला काय दिलं, त्यांच्या खिशात काय आहे?. खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा, तसे हे दिल्लीचे बाजीराव, असे म्हणत राऊत यांनी केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर टीका केलीय. महाराष्ट्राने देशाला सातत्याने देण्याची दानत दाखवली, पण महाराष्ट्रावर कायम अन्याय झालाय. महाराष्ट्र देशाचं पोट भरतो, पण महाराष्ट्राच्या पोटाकडे सरकार पाहत नाहीत. सध्या, आकड्यात पडायचं नाही, किती खरे-किती खोटे हे सहा महिन्यांनी कळतं. आता, आर्थिक थापा मारणं बंद केलं पाहिजे, सामान्य जनतेला पोटाची भाषा कळते, तरुणांना रोजगाराची भाषा कळते, असे म्हणत राऊत यांनी सर्वसामान्यांना या अर्थसंकल्पातून काय मिळाले? असा सवाल उपस्थित केला आहे. पेट्रोलचे भाव आत्ताच 100 रुपये लिटरपर्यंतो पोहोचले आहेत. आता, 1 हजार रुपये लीटर करून कायमचं मारायचं आहे का? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला. तसेच, 1 हजार रुपये लिटर पेट्रोल झाल्यानंतर लोकं घरातून बाहेर पडणारच नाहीत. पेट्रोल दरामुळे लॉकडाऊन होईल, लोकांनी घरातच हरीभजन करत बसावं, असं वाटत असेल, असे म्हणत केंद्र सरकारच्या बजेटवर संजय राऊत यांनी टीका केलीय. नागपूर मेट्रोसंदर्भात प्रश्न विचारला असता, नागपूर आणि नाशिकला भाजपाची सत्ता राहणार नाही. मुंबईची मेट्रो का रखडवली? केंद्राची जमीन आहे म्हणता, मंगळावरून आणली का चंद्रावरून, असा प्रश्न उपस्थित करत मुंबई मेट्रो सुरू करून देण्याची मागणीही राऊत यांनी केलीय. तसेच, बंगाल, तामिळनाडू, केरळसाठी विशेष तरतूद यावर बोलताना हा अर्थसंकल्प देशाचा आहे की राजकीय पक्षासाठीच्या निधीवाटपाचा, राष्ट्रीय कोषातून निवडणुकांसाठी निधीवाटप सुरू आहे का? असेही राऊत म्हणाले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:52 PM 01-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here