बनावट गुटख्याच्या कारखान्यावर छापा टाकून लाखोंचा गुटखा जप्‍त

0

चिपळूण : शहरालगतच्या कामथे-माटेवाडी येथील जैन मंदिराजवळ बंद अवस्थेत असलेल्या एका बंगल्यात बनावट गुटख्याच्या कारखान्यावर येथील पोलिसांनी छापा टाकून लाखोंचा गुटखा जप्‍त केला आहे. तसेच गुटखा बनविण्याची यंत्रणादेखील जप्‍त करण्यात आली आहे. गुरुवारी (दि.25) सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास उपविभागीय पोलिस अधिकारी सुरज गुरव, पोलिस निरीक्षक देवेंद्र पोळ     व पोलिस कर्मचार्‍यांनी या ठिकाणी  छापा टाकला यावेळी एका बंद बंगल्यामध्ये गुटखा बनविण्याचे साहित्य व बारा ते पंधरा गुटखा भरुन ठेवलेली पोती आढळून आली आहेत. पोलिसांनी या बंगल्याची पाहणी करुन पंचनामा करण्याची कारवाई सुरू केली आहे. तसेच अन्‍न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांना या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. अन्‍न व औषध प्रशासनाचे अधिकारी रत्नागिरीहून चिपळूणमध्ये रात्री उशिरा दाखल झाले. त्यांनी बनावट गुटखा व यंत्रसामुग्रीचा पंचनामा सुरू केला होता. या छाप्यामध्ये विविध कंपन्यांचा बनावट गुटखा सापडला आहे. सध्या राज्यामध्ये गुटखा बंदी असताना चोरट्या पद्धतीने गुटख्याची विक्री होत आहे. मध्यंतरी चिपळूण तालुक्यातील कालुस्ते येथेही बनावट गुटख्याच्या एका कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकला होता. त्यानंतर येथील कारखाना बंद झाला होता. मात्र, आता कामथेमध्ये बंद बंगल्यात अशाच पद्धतीने गुटख्याचा कारखाना सुरू असल्याचे उघड झाले आहे. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत या संदर्भात कारवाई सुरू होती. अधिक तपास पोलिस निरीक्षक देवेंद्र पोळ करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here