कोल्हापूरची बॅडमिंटनपटू जान्हवीची अल्पावधीत गरुडभरारी

0

कोल्हापूर : कोल्हापूरची कन्या जान्हवी कानिटकर या उदयोन्मुख बॅडमिंटनपटूने वयाच्या 15 व्या वर्षी दहा राज्यस्तरीय पदके, राष्ट्रीय मानांकनात 9 वा क्रमांक आणि आदिदास कंपनीची ब्रँड अ‍ॅम्बेसीडरअशी अल्पावधीतच गरुडभरारी घेतली आहे. कोल्हापूरची सायना नेहवाल म्हणून ती पुढे येत आहे. आजी-आजोबांकडून बॅडमिंटनचे बाळकडू मिळालेल्या जान्हवीने आठव्या वर्षी रॅकेट हातात धरली. जान्हवीचे वडील मंदार कानिकटर विद्यापीठस्तरीय बॅडमिंटन खेळले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनखाली जान्हवीने सराव सुरू केला. थोड्याच कालावधीत वडिलांनी तिची खेळातील चुणूक हेरली आणि तिची स्पर्धात्मक  खेळासाठी तयारी करून घ्यायला सुरुवात केली. वयाच्या नवव्या वर्षी तिने दहा वर्षांखालील गटात जिल्हा स्पर्धेत विजतीपदे मिळवली. त्यानंतर जान्हवीने मागे वळून पाहिलेच नाही. कराड व मुंबईत  झालेल्या स्पर्धेत राज्य अजिंक्यपद पटकावले, परभणी येथे 13 वर्षांखालील एकेरी व दुहेरीत अजिंक्यपद मिळवले. 2017 मध्ये काकिनाड (आंध्र प्रदेश) येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवर स्पर्धेत तिने उपविजतेपद पटकावले. 17 वर्षांखालील मुलींच्या गटात नांदेड व ठाणे येथे झालेल्या स्पर्धेत सलग दोन वर्षे दोनदा विजतेपद पटकावले. पुढे नागपूर येथेही ऑल इंडिया स्पर्धेत  गोपीचंद अ‍ॅकॅडमीच्या अव्वल मानांकित खेळाडूस सरळ सेटमध्ये पराभूत करीत राष्ट्रीय स्पर्धेतही तिने आपली छाप उमटवली. जान्हवीला 17 व  19 वर्षांखालील मुलींच्या  दोन्ही गटांत राष्ट्रीय मानांकन आहे. सध्या अकरावीच्या वर्गात शिकणारी जान्हवी सध्या ठाणे येथे श्रीकांत वाड याच्यांकडे आंतरराष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक अक्षय देवलकर यांच्या तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न उराशी बाळगलेली जान्हवी दिवसातून दोन वेळा कसून सराव, ग्राऊंडवर फिटनेस प्रॅक्टिस आणि नंतर जिममधील व्यायाम अशी जोरदार तयारी करीत आहे. या सर्व प्रवासासाठी तिला कोल्हापूरचे पालकमंत्री  चंद्रकांत पाटील यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here