मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडी वेगाने सुरू आहेत. राष्ट्रवादीमध्ये नाराजीनाट्य सुरुच आहे. तर याच दरम्यान आज, शिवसेना नेते संजय राऊत आज शरद पवार यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. भाजप- शिवसेना युतीची अद्याप घोषणा झालेली नाही. दोन्ही पक्षांकडून युतीची घोषणा लवकरच होईल, असे सांगितले जात आहे. जर शिवसेनेला २८८ पैकी १४४ जागा न मिळाल्यास युती तुटू शकते, असे संकेत संजय राऊत यांनी याआधी दिले होते. या पार्श्वभूमीवर आज, संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला गेल्याने राजकीय वतुर्ळात चर्चेला उधाण आले आहे. काल, शरद पवार यांनी आपल्याला समर्थन दिल्याबद्दल शिवसेनेचे आभार मानले होते. युतीबाबत दोन दिवसांत घोषणा होईल. मी २८८ मतदारसंघातील इच्छुकांना बोलावले आहे, म्हणजे युती तुटणार का…तर नाही, असे उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत इच्छुक उमेदवारांच्या मेळाव्यात बोलताना स्पष्ट केले होते. ५३ वर्षांत शिवसेना सत्तेत राहिली नाही, मात्र आमच्या भूमिकेकडे देशाचे लक्ष असते. भगवा महाराष्ट्रात फडकल्याशिवाय राहणार नाही. हा महाराष्ट्र आहे, सुडाचे राजकारण कधीच सहन करणार नाही. आम्ही कोणाशी सुडाने वागणार नाही, असे सांगत त्यांनी भाजपवर निशाणा साधला होता.
