नवी दिल्ली : नीती आयोगाच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुश्री खुल्लर यांच्यासह चार माजी वरिष्ठ अधिकार्यांवर खटला चालविण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्याविरोधात जो खटला चालविला जाईल, त्यासोबत खुल्लर आणि इतर अधिकार्यांविरोधातील खटला चालविला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. आयएनएक्स मीडीया कंपनीमध्ये 2007 साली विदेशातून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याच्या निर्णयाला परवानगी देण्यात आली होती. या प्रकरणात मोठा घोटाळा असून हवाला मार्गाचाही अवलंब करण्यात आल्याचा तपास संस्थांचा आरोप आहे. आयएनएक्स मीडिया प्रकरणी गेल्या महिन्यात सीबीआयने चिदंबरम यांना नाट्यमयरित्या अटक केली होती. सध्या चिदंबरम तिहार तुरुंगात असून न्यायालयाने त्यांना 3 ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावली आहे. ज्यावेळी आयएनएक्स मीडियामध्ये विदेशी गुंतवणुकीला परवानगी देण्यात आली होती, त्यावेळी सिंधुश्री खुल्लर वित्त मंत्रालयात अतिरिक्त सचिव होत्या. कालांतराने त्या तत्कालीन नियोजन आयोग म्हणजे आताच्या नीती आयोगात मुख्य कार्यकारी अधिकारी बनल्या होत्या. सिंधुश्री खुल्लर यांच्यासह ज्या माजी वरिष्ठ अधिकार्यांवर खटला चालविला जाणार आहे, त्यात वित्त खात्याचे तत्कालीन संयुक्त सचिव अनूप पुजारी, याच खात्यातील तत्कालीन संचालक प्रबोध सक्सेना आणि तत्कालीन अव्वर सचिव रवींद्र प्रसाद यांचा समावेश आहे. चिदंबरम यांच्याविरोधात खटला चालविण्याच्या प्रस्तावाला गेल्या फेब्रुवारी महिन्यात सरकारने मंजुरी दिली होती. खुल्लर आणि इतर तीन माजी अधिकार्यांविरोधात खटला चालविण्यास हरकत नसल्याचे केंद्रीय दक्षता आयोगाने स्पष्ट केल्यानंतर आता या लोकांविरोधात खटला चालविण्यास सरकारने मंजुरी दिली आहे.
