देवरूख : संगमेश्वर तालुक्यात बिबट्याचा मुक्त संचार सुरू असतानाच रविवारी सकाळी नजीकच्या पूर येथील सप्तलिंगी नदीपात्रात नर जातीचा बिबट्या मृताअवस्थेत मिळून आला. बिबट्याचे शवविच्छेदन करून वाशी येथे वनाधिकारी, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. देवरूख नजीकच्या पूर-झेपलेवाडी येथील ग्रामस्थ नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास पुलावरून ये-जा करत असताना सप्तलिंगी नदीपात्रात बिबट्या मृतावस्थेत दिसून आला. ग्रामस्थांनी ही बाब वनविभागाच्या निदर्शनास आणून दिली. यानुसार उपविभागीय वनाधिकारी भवर यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वनाधिकारी प्रियंका लगड, वनपाल सुरेश उपरे, वनरक्षक शर्वरी कदम, सागर गोसावी यांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याला नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले. यानंतर अधिकारी वर्गाने पंचनामा केला. बिबट्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती. डॉ. पवार यांनी बिबट्याचे शवविच्छेदन केले. बिबट्या नर जातीचा, 6 वर्षे वाढीचा व सुमारे 6 फूट लांबीचा असल्याची माहिती वनविभागाकडून प्राप्त झाली आहे. वाशी येथे बिबट्याला अग्नी देत अंत्यसंस्कार करण्यात आले. बिबट्याच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकलेले नाही. बिबट्याची सर्व नखे जशीच्या तशी होती. यावरून बिबट्याची शिकार झालेली नसल्याचे वनविभागाने स्पष्ट केले.
