रविवारी घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी दिल्ली आणि मुंबईत वेगवान राजकीय घडामोडी घडल्या आहेत. भाजप-शिवसेना युती जाहीर झाली नसली तरी ती निश्चितपणे होणार असल्याची माहिती दिल्लीतून बाहेर पडली होती. दरम्यान माजी मुख्यमंत्री खा.नारायण राणे यांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याची चर्चा दिवसभर सुरू होती. युती आणि राणे यांचा भाजप प्रवेश याबाबतचे निर्णय दोन दिवसात होणार असल्यामुळे सोमवारपासूनच महाराष्ट्रप्रमाणेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातही राजकीय धमाके होण्याची शक्यता आहे. भाजपाला 144, शिवसेनेला 126 आणि मित्रपक्षांना 18 असा जागा वाटपाचा फॉर्म्युला रविवारी दिल्लीत झालेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत मान्य करण्यात आल्याची बातमी सायंकाळी बाहेर पडली होती. त्यामुळे युती होणार यावर शिक्कामोर्तब झाल्याचे मानण्यात येत होते. दरम्यान शिवसेनेने काही उमेदवारांना रविवारी एबी फॉर्म वाटप केले. त्यामध्ये पालकमंत्री दीपक केसरकर यांना सावंतवाडीतून उमेदवारी देण्यात आली असून त्यांना एबी फॉर्म देण्यात आला. कुडाळमधून आ.वैभव नाईक यांना रविवारी एबी फॉर्म देण्यात आला आहे. शिवसेनेने एबी फॉर्म देताना ज्या ठिकाणी त्यांचे आमदार यापूर्वी निवडून आले आहेत अशाच ठिकाणी एबी फॉर्म दिल्यामुळे युतीवर शिक्कामोर्तब झाल्याचा दावा राजकीय निरीक्षकांकडून करण्यात येत आहे. रविवारच्या दिवसभरातील महत्वाची चर्चा होती ती राणे यांच्या भाजप प्रवेशाची. 2 ऑक्टोबर रोजी मुंबईत चर्चगेट येथील गरवारे क्लब सभागृहात राणे यांचा भाजप प्रवेश होणार असल्याची बातमी सोशल मिडियावर आणि टीव्ही चॅनेलवर पसरली होती. आ.नितेश राणे आणि माजी खा. निलेश राणे हेही त्यांच्यासमवेत प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात होते. सायंकाळी उशिरा टीव्ही चॅनेलवरील बातम्यांमध्ये राणे यांचा भाजप प्रवेश लांबणीवर असेही सांगण्यात येत होते. सायंकाळी उशिरापर्यंत राणे यांच्या भाजप प्रवेशाबाबत भाजपकडून अधिकृत कोणतीही माहिती जाहीर झालेली नाही. मुंबईत गरवारे क्लबमध्ये सोमवारी वंचित आघाडीचे पडळकर यांचा भाजप प्रवेश होणार आहे अशी माहिती मिळाली आहे. त्याच सभागृहात राणे यांचा 2 तारखेला प्रवेश होणार असून स्वाभिमान पक्षाच्या सिंधुदुर्गातील कार्यकर्त्यांना त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याच्या सूचना मिळाल्याचीही माहिती आहे. राणे यांच्या भाजप प्रवेशावर बरेच काही अवलंबून असल्यामुळे त्यादृष्टीने स्वाभिमान पक्ष आणि भाजपमध्ये आणि शिवसेनेमध्येही जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. येणार्या दोन-तीन दिवसात सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. राणे यांचा भाजप प्रवेश झालाच आणि युती झाली तर कणकवली विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उमेदवार उभा करणार असेही यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे राणे यांच्या भाजप प्रवेशाबरोबरच शिवसेनेचा उमेदवार कोण असेल? याचा अंदाज बांधला जात आहे. दरम्यान संदेश पारकर हे कणकवली विधानसभा मतदारसंघात उतरणार असून त्यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी सुरू झाल्याची चर्चा आहे. त्यांना भाजपमधुनही उमेदवारी मिळू शकते असा दावा केला जात आहे. दीपक केसरकर यांनी राणे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना राणे यांचा भाजप प्रवेश होईल असे आपल्याला वाटत नाही असे म्हटले आहे. तरीही तसे झालेच तर काय करावे याची रणनिती शिवसेनेने आखल्याची माहिती मिळाली आहे. अजुनही युती अधिकृतरित्या जाहीर झालेली नाही. युती होईल की नाही अशी शंका आजही घेतली जात आहे. युती झालीच नाही तर मात्र या विधानसभा निवडुकीचे राजकारण खुपच ढवळून निघणार आहे. शिवसेनेने या सर्व परिस्थितीत काही मोठ्या नेत्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक मोठा नेता रविवारी मुंबईत होता आणि त्याच्याशी प्रवेशाबाबत शिवसेना नेत्यांशी चर्चा सुरू होती. त्या नेत्याचा शिवसेना प्रवेश लवकरच होईल असा दावा शिवसेनेच्या मुंबईतील सुत्रांकडून करण्यात येत होता. आणखी काही स्थानिक नेते व पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करतील का? यादृष्टीने शिवसेनेच्या नेत्यांकडून चाचपणी सुरू होती. राज्यस्तरावरील घडामोडी घडण्यास सोमवारपासून जोरदार सुरूवात होईल आणि त्याचवेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजाकरणातही खळबळ उडविणार्या घटना घडतील अशी चिन्हे दिसत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होईल असे वाटत आहे. काँग्रेसने 51 उमेदवारांची यादी रविवारी सायंकाळी उशिरा जाहीर केली. मात्र यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेसचा एखादा उमेदवार जाहीर झाल्याची माहिती सायंकाळी उशिरापर्यंत मिळाली नव्हती. तरीही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघापैकी काँग्रेसला कोणते आणि राष्ट्रवादीला कोणते हेही स्पष्ट झालेले नव्हते. तरीदेखील एम.के. गावडे यांना सावंतवाडीतून राष्ट्रवादीने उमेदवारी निश्चित केल्याचे सांगण्यात येते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगांवकर यांनी भेट घेतली होती. साळगांवकर यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळेल अशी शक्यता व्यक्त होत होती, परंतु शरद पवार यांनी साळगांवकर यांच्याकडे नगराध्यक्षपद असल्यामुळे तूर्त त्यांनी थांबावे आणि एम.के. गावडे यांना उमेदवारी द्यावी अशी भुमिका घेतल्याची चर्चा रविवारी सुरू होती.
