रत्नागिरी : कर्ज व्यवहारांमध्ये गैरव्यवहार केल्याप्रकरणी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तत्कालीन शाखाधिकार्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या कर्ज व्यवहारांसाठी फसवी कागदपत्रे तयार करून बँकेची सुमारे 3 कोटी 43 लाख 71 हजार 591 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपहार 13 मे 2014 ते 4 सप्टेंबर 2018 या कालावधीत माळनाका येथील शाखेत घडला आहे. सचिन मधुकर चौगुले असे गुन्हा दाखल झालेल्या शाखाधिकार्याचे नाव आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेला वेगवेगळ्या उत्कृष्ट कामकाजासाठी शासनाचे अनेक पुरस्कार मिळत आहेत. बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे आणि त्यांच्या सहकारी संचालकांनी या जिल्हा बँकेला राज्यात नावलौकिक मिळवून दिला. एकीकडे ही अशी परिस्थिती असताना चुकीच्या पद्धतीने कामकाज करणार्यांना शोधून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचाही बडगा उचलला जात आहे. त्यातूनच सचिन मधुकर चौगुले (वय 51, रा.जोळी पाळंद, रत्नागिरी) या तत्कालीन शाखाधिकार्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे लेखा क्षेत्र तपासणीस सुनील सीताराम गुरव (55, रा.शंखेश्वर पार्क, रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, 2014 ते 2018 या कालावधीत सचिन चौगुले हा माळनाका येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत शाखाधिकारी पदावर कार्यरत होता. या काळात त्याने वेगवेगळ्या प्रकारच्या कर्जप्रकरणी गैरव्यवहार करून तसेच खोटी कागदपत्रे तयार करून स्वतःच्या फायद्यासाठी बँकेचा तोटा केला. तसेच बँकेच्या सर्व संचालक मंडळाला अंधारात ठेवून मनमानी व्यवहार करून फसवणूक केली होती. याबाबत अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.
