बांबर्डे येथे पुन्हा एकदा हत्तींची धुडगूस

0

साटेली भेडशी : बांबर्डे येथे पुन्हा एकदा हत्तींनी धुडगूस घालत जयसिंग देसाई, राऊ देसाई, विजय देसाई यांच्या भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. तर शनिवारी रात्री भर वस्तीत घुसत घाटिवडे पोलिसपाटील प्रकाश देसाई यांची त्यांच्या घराशेजारी ठेवलेली दुचाकी व गणपत देसाई यांची दुचाकी हत्तींनी ढकलून दिल्याने या दोन दुचाकींचे मोठे नुकसान झाले. मागील पंधरा दिवस हत्तींचा परिसरात वावर नव्हता; मात्र शुक्रवारी हे हत्ती पुन्हा बांबर्डे गावात प्रकट झाले. त्या रात्री त्यांनी बांबर्डे गावातील भात शेती फस्त केली. शनिवारी या हत्तींनी आपला मोर्चा घाटिवडे गावाकडे वळविला. तेथील भात शेती तुडवल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास हे हत्ती थेट वस्तीमध्ये दाखल झाले. पोलिसपाटील यांच्या घराच्या अंगणात येत त्यांनी त्यांची दुचाकी सोंडेत पकडून परसात भिरकावून दिली. या आवाजाने जाग आल्याने  देसाई यांनी खिडकीतून बाहेर पाहिले असता अंगणात दोन महाकाय हत्ती उभे असल्याचे दिसून आले. हे द‍ृश्य पाहून ते चांगलेच हादरले. हत्तींनी तसेच पुढे जात प्रकाश देसाई यांचे शेजारी गणपत देसाई यांच्या घराच्या अंगणात प्रवेश केला व त्यांची मोटारसायकलही सोंडेत पकडून भिरकावून दिली. या गावात दोन हत्तींचा वावर असल्याची माहिती वनरक्षक श्री.मोकाडे यांनी दिली.आजपर्यंत हे हत्ती शेतीचेच मोठ्या प्रमाणात नुकसान करत होते व ते शेतातून जंगलात जायचे. परंतु आता हे हत्ती घरापर्यंत पोहचून नागरिकांच्या साहिम्याचे   नुकसान करत असल्याने नागरिकांना घरा बाहेर पडणेही धोकादायक बनले आहे.   हे हत्ती आता घरापर्यंत पोहचू लागले तर हत्ती घरात येवून  माणसांवर हल्लाही  करु शकतात, अशी भीती गावातील नागरिकांनी व्यक्‍त केली. गेली चार वर्षे दोडामार्ग तालुक्यात हत्तींचा धुमाकूळ सुरु आहे. हत्ती शेती  व बागायतींची नुकसान करत असल्याने शेतकरी हतबल बनले आहेत. अनेक शेतकर्‍यांनीतर शेती करण्याचे सोडून दिले आहे. वन विभागाकडून शेती नुकसान भरपाई मिळते, मात्र ती तुटपुंजी असते. कारण काही शेतकर्‍यांचे सर्वस्वी उपजीविकेचे साधन हे शेती असते. परंतु तेच नाहीसे झाल्याने येथील शेतकरी मोठ्या संकटात सापडतो. असे असताना प्रशासन मात्र याकडे डोळेझाक करत असल्याचे दिसून येत असल्याने शेतकर्‍यांतून मात्र तीव्र नाराजी व्यक्‍त केली जात आहे. हत्तींपासून शेतीचे व आपले संरक्षण करायचे तरी कसे असा प्रश्‍न आता  लोकांना पडला असून, हत्तीनी एखाद्याचा जीव घेतल्यावर प्रशासनाला जाग येणार काय? असा सवाल तालुक्यातील नागरिकांचा आहे. या हत्तींचा बंदोबस्त केव्हा व कधी करणार असे अनेक प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here