नवी दिल्ली : ऐन सणासुदीच्या काळात कांद्याचे भाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व प्रकारच्या कांद्याची निर्यात तत्काळ प्रभावाने थांबविली आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने हा निर्णय घेतला. देशभरात सध्या कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. कांद्याची टंचाई निर्माण झाल्याने कांद्याच्या दरात मोठी वाढ होऊन त्याचा सर्वसामान्य नागरिकांवर प्रभाव पडत आहे. त्यामुळे दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने सर्व प्रकारच्या कांद्याची निर्यात तात्काळ प्रभावाने थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी केंद्रीय अन्न व नागरीपुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी सरकारकडे कांद्याचा पुरेसा साठा (बफर स्टॉक) आहे. विविध राज्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे कांद्याचा पुरवठा केला जात असून किमतीही नियंत्रणात येत असल्याचे सांगितले होते. दिवाळीपूर्वी महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुक प्रचारातच कांद्याच्या दरवाढीचा मुद्दा महत्वाचा ठरण्याची शक्यता आहे. कांद्याया किंमती गगनाला भिडल्या आहेत. कांदा खायचा की नाही अशी काहीशी परस्थिती सर्वसामान्य नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. शहरी भागात कांद्याच्या दराने साठी ओलांडली आहे. गेल्या एक महिन्यांपासून कांदा दरामध्ये दररोज वाढ होत आहे. शनिवारी लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लिलाव झाले. तेव्हा उन्हाळ कांद्याला कमीत कमी ११०० सरासरी 3600 जास्तीत जास्त 3880 रुपये भाव मिळाले होते. कांदा दरावर अंकुश लावण्यासाठी केंद्र सरकारने लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठ दिवसांमध्ये दोनदा शिष्टमंडळ पाठवून बाजारभाव वाढीबाबतचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला होता.
