शिक्षक नोकरीसाठी ‘टीईटी’ परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक

0

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घेण्यासाठी मान्यता मिळावी यासाठी पाठविलेला प्रस्ताव अखेर राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने मंजूर केला आहे. यामुळे आता ही परीक्षा डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये होण्याची शक्यता आहे. प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांची नोकरी मिळावी यासाठी ‘टीईटी’ परीक्षा उत्तीर्ण होण्याची अट घालण्यात आलेली आहे. वर्षातून दोन वेळा ही परीक्षा घेण्याचे नियोजन आधी करण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र वर्षातून एकदाच ही परीक्षा घेण्यात येत आहे. फेब्रुवारी 2013 पासून आतापर्यंत एकूण पाच परीक्षा घेण्यात आलेल्या आहेत. यात 69 हजार 706 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. गेल्या वर्षी 15 जुलै रोजी परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर 18 सप्टेंबर 2018 रोजी राज्य परीक्षा परिषदेकडून परीक्षा घेण्यास परवानगी मिळविण्याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. मात्र, त्यास त्वरित मान्यताच मिळाली नव्हती. त्यानंतर डिसेंबरमध्ये शालेय शिक्षण विभागाच्या कक्ष अधिकार्‍यांकडून परीक्षा कधी घेता येईल याबाबतची विचारणा परीक्षा परिषदेकडे करण्यात आली होती. त्यावर परीक्षा मार्च 2019 मध्ये घेण्याची तयारी दर्शविण्यात आली होती. त्यानंतरही शासनाकडून मान्यता मिळालीच नाही. पावसाळ्यात परीक्षा घेण्यात अनेक अडचणी येतात हे स्पष्टच होते. अखेर परीक्षा परिषदेकडून पुन्हा 25 जुलै 2019 रोजी शासनाला आठवण करून देण्यासाठी पुन्हा प्रस्ताव पाठविण्यात आला. यात येत्या डिसेंबरच्या अथवा जानेवारीच्या दुसर्‍या पंधरवड्यात परीक्षा घेण्यास मान्यता मिळावी असा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदचे आयुक्‍त तुकाराम सुपे यांनी पाठविला होता.  त्यास शालेय शिक्षण विभागाचे कक्ष अधिकारी स्वप्नील कापडणीस यांनी नुकतीच मान्यता दिली असून, त्याबाबातचे आदेशही परीक्षा परिषदेला प्राप्त झाले आहेत.


 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here