राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या रेश्मा माने हिने सुवर्णपदक पटकावले

0

कोल्हापूर : अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे सुरू असलेल्या 23 वर्षांखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या रेश्मा माने हिने सुवर्णपदक पटकावून महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. त्याचबरोबर स्वाती शिंदे, अंकिता गुंड आणि मनाली जाधव यांनी कांस्यपदकाची कमाई केली. सुवर्णपदक विजेत्या रेश्माची पुढील महिन्यात हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे होणार्‍या जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेत हरियाणाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. स्पर्धेचा शनिवारचा दिवस गाजला तो महिला कुस्तीगिरांच्या तुफानी लढतीनी. एकूण 10 वजनी भारतवर्षातील तब्बल 250 पेक्षा जास्त मुली या स्पर्धेत लढल्या. महाराष्ट्राच्या  रणरागिणींनी आज एक सुवर्णपदकासह तब्बल चार पदके जिंकली. 62 किलो वजन गटातील कुस्ती लढतीत रेश्माने दिल्‍लीच्या अनिता हिला नमवून महाराष्ट्राला सुवर्णपदकाचा मान मिळवून दिला. रेश्माने कुस्ती जिंकताच स्पर्धास्थळी उपस्थित कुस्तीशौकिनांनी प्रचंड जल्‍लोष केला. पंजाबच्या लवलीना कौर आणि हरियाणाच्या पूजा यांना या गटात कांस्यपदके मिळाली. रेश्मा ही कोल्हापूर जिल्ह्यातील वडणगे येथील शाहू कुस्ती संकुलात आपले वडील अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते आहे. या सुवर्णपदकाबरोबरच शनिवारी महाराष्ट्राला आणखी तीन कांस्यपदके मिळाली. 65 किलो वजन गटात मनाली जाधवने तर 59 किलो गटात अंकिता गुंड या दोन पुणेकरांबरोबरच 50 किलो गटात कोल्हापूर (मुरगूड) येथील स्वाती शिंदे हिला कांस्यपदकाचा मान मिळाला. मनाली ही सह्याद्री कुस्ती केंद्र वारजे येथे विजयकाका बराटे यांच्याकडे सराव करते. आंतरराष्ट्रीय पंच दिनेश गुंड यांची कन्या अंकिता आळंदीच्या जोग महाराज कुस्ती केंद्रात त्यांच्याकडेच कुस्तीचे धडे गिरवते आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील संजयदादा मंडलिक कुस्ती केंद्राची स्वाती ही दादा लवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. याच केंद्राच्या नंदिनी साळोखे चौथ्या क्रमांकावर राहिली. 53 किलो गटात कांस्यपदकाची लढतीत निसटता तिचा पराभव झाला. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here