दोडामार्ग : कळणे ग्रामस्थांनी गुरुवारी जीवन प्राधिकरणच्या निकृष्ट कामामुळे धोकादायक झालेल्या रस्त्याकडे लक्ष वेधण्यासाठी आगळेवेगळे आंदोलन छेडले. रस्त्याच्या चिखलमय साईडपट्टीवर ठिय्या मांडत कळणे ग्रामस्थ व एकनाथ नाडकर्णी यांनी सा. बां. विभागाचे लक्ष वेधले. तिलारी नदीचे पाणी वेंगुर्लेला नेण्यासाठी मणेरी ते वेंगुर्ले अशी पाईपलाईन टाकण्याकरिता खोदाई करण्यात आली. मात्र, हा चर व्यवस्थित न बुजविल्याने तसेच दोडामार्ग-बांदा राज्यमार्गाच्या साईडपट्टीचे काम निकृष्ट झाल्याने या रस्त्याची साईडपट्टी पूर्णपणे चिखलमय झाली आहे. कळणे येथे रस्त्याची साईडपट्टी खचल्याने अनेक अपघात होत आहेत. याबाबत सार्व.बांधकाम विभाग व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला वारंवार निवेदने देऊनही याकडे कोणीही लक्ष देत नसल्याची भावना कळणे ग्रामस्थांची आहे. या दुर्लक्षाच्या निपषेधार्थ गुरुवारी कळणे-फोंडीये पुलानजीक माजी जि.प. उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांच्या नेतृत्वाखाली कळणे ग्रामस्थ व महिलांनी थेट साईडपट्टीवरील चिखलातच ठिय्या मांडला. बांधकाम विभाग व प्राधिकरण विभागाचा निषेध करीत ग्रामस्थांनी सकाळपासून आंदोलन सुरू केले. मात्र संबंधित विभागाचे प्रतिनिधी येऊ न शकल्याने पोलिस प्रशासनाच्या विनंतीनुसार आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र 26 जुलै रोजी 11.30 वा पर्यंत सकारात्मक तोडगा न निघाल्यास दुपारी 12 वा रास्ता रोको करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. या आंदोलनात एकनाथ नाडकर्णी, पराग गावकार, रघुनाथ नाईक, सखुबाई यादव, अजित देसाई, राजन कळणेकर, विजय कळणेकर, सुनीता भिसे, देवेंद्र, सावंत आदी उपस्थित होते.
