दोहा : दोहा येथे सुरू असलेल्या वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पहिले यश मिळवले आहे. 4 बाय 400 मिश्र रिले प्रकारात भारताच्या मोहम्मद अनस, व्ही. के. विस्मया, निर्मल नोह टॉम आणि जिस्ना मॅथ्यू या चमूने टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले आहे. भारतीय खेळाडूंनी आपल्या हिटमध्ये तिसरे स्थान पटकावत अंतिम फेरीत प्रवेश केला. 3:16:14 अशी वेळ नोंदवत भारतीय संघ तिसर्या स्थानावर आला. यंदाच्या हंगामात भारतीय खेळाडूंनी नोंदवलेली ही सर्वोत्तम वेळ आहे. रविवारी रात्री या स्पर्धेची अंतिम फेरी खेळवली जाणार आहे. मोहम्मदने शर्यतीची सुरुवात करीत चांगला खेळ केला. मात्र, दुसर्या टप्प्यात भारतीय खेळाडू विस्मया मागे पडली. परंतु, वेळेतच स्वतःला सावरत विस्मयाने सर्व प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत पुन्हा एकदा आघाडी घेतली. तिच्या या पुनरागमनाला मैदानात उपस्थित असलेल्या सर्वांनीच दाद दिली. तिसर्या आणि चौथ्या टप्प्यात भारतीय खेळाडूंमध्ये थोडा गोंधळ पाहायला मिळाला; पण निर्मल टॉमने तिसरे स्थान पटकावून भारताचे ऑलिम्पिक तिकीट निश्चित केले.
