खेड : रत्नागिरी जिल्हा क्रीडा संकुल येथे नुकत्याच झालेल्या कोल्हापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्हाच्या विभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत खेड येथील हर्षदा पार्टे हिने सुवर्ण पदक पटकावले. तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. कोल्हापूर विभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धा नुकतीच रत्नागिरी येथील क्रीडा संकुलात झाली. या स्पर्धेत खेड येथील सहजीवन हायस्कूलमधील हर्षदा शंकर पार्टे हिची निवड झाली होती. तिने खेळातील कौशल्य दाखवत सुवर्णपदक पटकावले. हर्षदा हिने सन २०१८-१९ मध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदक पटकावले होते. तिने विभागीय शालेय स्पर्धेत देखील सुवर्णपदक मिळवून जिल्ल्ह्याचा नावलौकीक वाढवला आहे. गोंदिया येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेसाठी हर्षदा दि. १ ऑक्टोबर रोजी रवाना होणार आहे. या यशाबद्दल जिल्हा तायक्वांदो संघटना अध्यक्ष व्यंकटेश कर्रा, शशांक घडशी, खेड येथील प्रशिक्षक प्रशांत कांबळे, पालक व क्रीडाप्रेमी, यांनी तिचे अभिनंदन केले आहे.
