रत्नागिरी : कोकण रेल्वेने प्लास्टिक मुक्तीचा ध्यास घेतला असून १६ सप्टेंबर ते महात्मा गांधी जयंतीपर्यंत स्वच्छता पंधरवडा साजरा केला जाणार आहे. आतापर्यंत सुमारे दीड टन प्लास्टिक कचऱ्याचे उच्चाटन केल्याची माहिती कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक उपेद्र शेंड्ये यांनी दिली. पत्रकार परिषदेत शेंड्ये म्हणाले, या स्वच्छता मोहिमेला स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी, रिक्षा व्यावसायिक आणि विशेष करून फेरीवाले यांनी प्रतिसाद दिला. विविध उपक्रम राबवण्यात आले. प्रवाशांनाही यात सहभागी करून घेण्यात आले आहे. या निमित्ताने रेल्वेच्या कार्यक्षेत्रात प्लास्टिक बंदी करण्यात आली असून खानपान सेवेत पर्यावरणपूरक साहित्य वापरण्यावर भर देण्यात आला आहे. यामध्ये प्राधान्याने चमचे, ग्लास, डिश आदी साहित्य पर्यावरणपूरक वापरण्यात येणार आहे. तशा सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. पंधरवड्याच्या निमित्ताने कोकण रेल्वे प्रशासनाने दोन बोगद्यांची पूर्ण सफाई केली. यामध्ये टिके आणि करबुडे या बोगद्यांचा समावेश आहे. यातून पाचशे पोती प्लास्टिकचे उच्चाटन करण्यात आले. तसेच रत्नागिरी स्थानक येथे रिकाम्या पाण्याच्या बाटल्यांची विल्हेवाट लावण्यासाठी यंत्र ठेवण्यात आले असून त्याचे उद्घाटन शुक्रवारी करण्यात आले. स्वच्छता मोहिमेच्या निमित्ताने काही स्वयंसेवी संस्थांनी १०० कचरा टाकण्याच्या पेट्या भेट दिल्या.
