रत्नागिरी : जिल्ह्यातील सर्वात मोठे मच्छीमारी बंदर म्हणून ओळख असलेल्या मिरकरवाडा बंदराचा क्षमतेपेक्षा अधिक वापर होत आहे. पाचशे नौकांची क्षमता असलेल्या मिरकरवाडा बंदरावर त्यापेक्षा अधिक मच्छीमारी नौका ये-जा करतात. याशिवाय काही नौका दिर्घ कालावधीसाठी तर काही विना वापराच्या नौकादेखील बंदरातच असल्याने स्थानिक मासेमारी नौकांसमोर नवे संकट उभे राहीले आहे. मागील काही कालावधीपासून मासेमारी व्यवसायाकडे वाढलेला कल आणि मोठ्या प्रमाणावर झालेली नौकांची नोंदणी यामुळे जिल्ह्यातील सर्वात मोठे बंदरदेखील मासेमारी नौकांसाठी कमी पडू लागले आहे. बंदराची क्षमता चारशे ते साडेचारशे बोटी सामावून घेण्याइतपत असताना या बंदरावर दररोज पाचशे तर कधीकधी त्यापेक्षाही अधिक मासेमारी नौका मासेमारीसाठी ये-जा करीत असतात. यामध्ये स्थानिक आणि बाहेरील नौकांचा समावेश आहे. दररोज येणाजाणाऱ्या नौकांसह दीर्घ कालावधीसाठी बंदरावर उभ्या असलेल्या आणि काही नादुरूस्त नौकांमुळे मिरकरवाडा बंदर दिवसेंदिवस मच्छीमारी नौकांसाठी अपुरे पडू लागले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठे बंदर म्हणून मिरकरवाडा बंदराकडे पाहिले जाते. मिरकरवाडा बंदर विकासासाठी राजय शासनाने निर्णय घेतला. यासाठी मिरकरवाडा बंदर विकास टप्पा दोन अंतर्गत विकास निधी मंजूर करण्यात आला. परंतु, चार वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटल्यानंतरही टप्पा दोनमधील अनेक कामे केवळ कागदावरच आहेत. मिरकरवाडा येथील एल आकाराची जेटी वगळता अन्य कोणत्याही कामांचा शुभारंभ झालेला नाही. मिरकरवाडा टप्पा दोनमध्ये मच्छीमारांसह मच्छीमारी नौकांसाठीही अनेक सुविधा प्रस्तावित आहेत. परंतु, प्रत्यक्ष कामाला सुरूवात होण्यासाठी बराच कालावधी लागण्याची शक्यता मच्छीमारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
