दुकानवाड : भडगाव येथे मोटारसायकलसह दाम्पत्य नदीत कोसळून पत्नी वाहून गेल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी कुडाळ तालुक्यातीलच माणगाव-शिवापूर रस्त्यावरील कर्ली नदीपात्रातील दुकानवाड कॉजवेवरून जाणारा मोटारसायकलस्वार गाडीसह नदीत पडला. गोरखनाथ राजन कविटकर (वय 30, रा. उपवडे-तेरगळवाडी) असे या तरुणाचे नाव आहे. सुदैवाने कॉजवेला असलेल्या एकमेव निसाचा गोरखनाथला आधार मिळाल्याने तो गाडीसह अडकला. याच वेळी पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे गोरखनाथने प्रसंगावधान राखत मोटारसायकल सोडल्यामुळे ती वाहून गेली. तर गार्डस्टोनला लोंबकळणार्या गोरखनाथ याला लगतच असलेल्या दोन शेतकर्यांनी बाहेर काढले. त्यामुळे गोरखनाथचा जीव वाचला. ही घटना गुरूवारी दुपारी 12 वा.च्या सुमारास घडली. माणगाव खोर्यात गुरूवारी सकाळपासून पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात सुरू होता. यामुळे नदी व नाल्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत होती. उपवडे-तेरगळवाडी येथील गोरखनाथ हा मोटारसायकलने दुकानवाड मार्गे टांळबा येथे जात होता. तो दुकानवाड कॉजवेवर आला असता कॉजवेवरुन पाणी वाहत होते. मात्र गोरखनाथयाने अतिआत्मविश्वास दाखवत कॉजवेवरुन वाहणार्या पाण्यातूनच मोटारसायकल नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, गोरखनाथला पाण्याचा अंदाज आला नाही व मोटारसायकल प्रवाहात सरकली. सुदैवाने कॉजवेला एकमेव शिल्लक असलेल्या गार्डस्टोनला मोटारसाकल अडकून राहिली. भीतीने गोरखनाथ ओरडू लागला. याचवेळी लगत शेतात असलेल्या प्रदीप वारंग व दीपक भिके या शेतकर्यांनी धाव घेत गोरखनाथला मोटारसायकल सोडून बाहेर येण्याची सूचना केली. मात्र, मोटारसाकल वाहून जाईलया भीतीने तो मोटारसायकल सोडत नव्हता. दरम्यान, पाण्याचा प्रवाह वाढत असल्याने त्याने जीव वाचविण्यासाठी मोटारसायकल सोडली असता मोटारसायकल पुराच्या पाण्यात वाहून गेली. दरम्यान, गोरखनाथने निसाचा आधार घेतला. यावेळी प्रदीप वारंग व दीपक भिके या शेतकर्यांनी त्याला पाण्यातून बाहेर काढल्याने त्याचा जीव वाचला. अन्यथा मोटारसायकलसह गोरखनाथही पाण्यासोबत वाहून गेला असता. सायंकाळी उशिरापर्यंत सरपंच सागर म्हाडगुत व येथील ग्रामस्थांनी वाहून गेलेल्या मोटारसायकलचा शोध घेतला. मात्र, पाण्याचा प्रवाह मोठा असल्यामुळे मोटारसायकल सापडली नाही.
