मासेमारीवरील बंधनांमुळे शासनाचेही नुकसान

0

रत्नागिरी : जिल्ह्यातील प्रमुख मत्स्य बंदर म्हणून ओळखल्या जाणार्‍या मिरकरवाडा बंदरातून मिळणारे सेवाशुल्क गेल्या तीन वर्षांत कमालीचे घटले आहे. तीन वर्षांपूर्वीच्या अधिसूचनेनुसार पर्ससीन नेट मासेमारीचा कालावधी कमी झाल्याने सेवाशुल्क वसुली कमी झाली आहे. ही पर्ससीन नेट मासेमारी तीन वर्षांपूर्वी आठ महिने चालायची. अधिसूचनेतील निर्बंधानुसार आता ही मासेमारी चार महिनेच सुरू असते. अधिसूचनेतील बंधनांमुळे मासेमारी नौका सप्टेंबर ते डिसेंबर या तीन महिन्यांतच मासेमारी करत असल्याने सेवाशुल्क घटले आहे. मिरकरवाडा बंदरात सुमारे 300 पर्ससीन नेट नौका आहेत. मिरकरवाडा बंदर प्राधिकरणाकडून प्रत्येक पर्ससीन नेट नौकेकडून प्रतिमहा साडेसातशे रुपये सेवाशुल्क घेतले जाते. सन 2016 पासून लागू झालेल्या अधिसूचनेनुसार ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत पर्ससीन नेट मासेमारी करावी लागते. अधिसूचना लागण्यापूर्वी ही मासेमारी ऑगस्ट ते मे पर्यंत चालू असायची. त्यामुळे प्रत्येक पर्ससीन नेट मच्छीमार नौकेकडून मिरकरवाडा बंदर प्राधिकरणाकडून प्रतिमहा साडेसातशे रुपये सेवाशुल्क मिळायचे. इतर मच्छीमार नौकांचे सेवाशुल्क तुलनेत फारच कमी आहे. यामध्ये ट्रॉलिंग मासेमारी करणार्‍या नौकेकडून 500 रुपये, गिलनेट नौकेकडून 150 रुपये तर बिगर यांत्रिकी नौकांकडून 50 रुपये सेवाशुल्क वसूल केले जाते. पर्ससीन नेट वगळता इतर मच्छीमार नौकांना आठ महिने मासेमारी करण्याची मुभा आहे. पावसाळी मासेमारी बंदी संपल्यानंतर 1 ऑगस्टपासून मासेमारी सुरू होत असली तरी पर्ससीन नेट मासेमारी विविध कारणास्तव 1 सप्टेंबरपासूनच सुरू होते. त्यामुळे प्राधिकरणाला 3 महिन्यांचे आणि मासेमारी परवाना असणार्‍या मच्छीमार नौकांकडूनच सेवाशुल्क मिळते. एकीकडे अधिसूचनेतील पर्ससीन नेट मासेमारीवरील निर्बंधानुसार मच्छीमार नौका मालकांचेच नव्हे तर शासनाचेही नुकसान होत आहे. त्याचबरोबर या मासेमारीवर अवलंबून असलेल्या अनेक पूरक व्यवसाय-उद्योगधंद्यांचेही नुकसान होत आहे. जितका काळ मासेमारी होते त्या कालावधीतच हे पूरक व्यवसाय तेजीत असतात. यामध्ये बर्फ कारखाने, फिश मिल कंपन्या, टेम्पो, मासळी कापून देणार्‍या महिलांसह इतर अनेकांच्या नुकसानीचा समावेश आहे. त्यात पारंपरिक आणि पर्ससीन नेट मच्छीमारांचे वितुष्टही वाढू लागले आहे. मिरकरवाडा बंदरातून नौका कर, डिझेल पंप आणि टाकी भाडे, वाहन कर आणि इतर आकारणी करण्यात येते. सन 2018-19 मध्ये मिरकरवाडा बंदरातुन 7 लाख 96 हजार 789 इतका कर वसुल करण्यात आला आहे.  2013-14 मध्ये नौका प्रवेश शुल्क 11 लाख 82 हजार 293 इतका नौका प्रवेश शुल्क आकारण्यात आला होता. तर 45 हजार इतका वाहन प्रवेश शुल्क आकारण्यात आला होता. सन 2005-06 मध्ये 86 हजार 395 नौका प्रवेश शुल्क आणि 46 हजार 665 वाहन प्रवेश शुल्क आकारण्यात आला होता. 2006-07 मध्ये 1 लाख 46 हजार 700 नौका प्रवेश शुल्क आणि 53 हजार 400 वाहन प्रवेश शुल्क आकारण्यात आला होता. 2007-08 मध्ये 83 हजार 700 नौका प्रवेश शुल्क आणि 81 हजार 228 वाहन प्रवेश शुल्क आकारण्यात आला होता. 2008-09 मध्ये 50 हजार 550 नौका प्रवेश शुल्क आणि 43 हजार 262 वाहन प्रवेश शुल्क आकारण्यात आला होता. 2009-10 मध्ये 2 लाख 13 हजार 750 नौका प्रवेश शुल्क आणि 42 हजार 750 वाहन प्रवेश शुल्क आकारण्यात आला होता. 2010-11 मध्ये 6 लाखा 7 हजार 900 नौका प्रवेश शुल्क आणि 1 लाख 1 हजार 336 वाहन प्रवेश शुल्क आकारण्यात आला होता. 2011-12 मध्ये 4 लाख 49 हजार 950 नौका प्रवेश शुल्क आणि 1 लाख 55 हजार 381 वाहन प्रवेश शुल्क आकारण्यात आला होता. 2012-13 मध्ये 8 लाख 98 हजार 146 नौका प्रवेश शुल्क आणि 46 हजार 396 वाहन प्रवेश शुल्क आकारण्यात आला होता. 

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here